दरवर्षी जून मध्ये येणारा वटपौर्णिमा हा सण विशेषकरून महिलांसाठी खास असतो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास असतो. या झाडाची प्रदक्षिणा केल्यास एकाच वेळी तिन्ही देवांची कृपा लाभते. या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुढील सात जन्म हाच पती लाभावा यासाठी प्रार्थना करतात. शास्त्रात वटवृक्षाला मंगळाचा कारक मानले गेले आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे त्यांनी, वटवृक्षाभोवती प्रदक्षिणा घालाव्या. १०० वर्ष जगण्याचे वरदान लाभलेल्या वडाला आपण फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी पुजतो. पण त्याचे आपल्या कसे फायदे होतात हे जाणून घेऊया.
वडाचे झाड हे २० तास ऑक्सिजन देते त्यामुळे त्याला नियमित प्रदक्षिणा घातल्या तर आपले आरोग्य निरोगी होते. त्या प्रमाणे वडाच्या प्रत्येक भागाचा वापर विविध गोष्टींसाठी केला जातो. जसा झाडाचा चिक हा दातदुखी, संधीवात व तळपायांच्या भेगांवर फायदेशीर ठरतो. वडाच्या पारंब्या खोबऱ्याच्या तेलात भिजवून केसांना हे तेल लावल्यास केस गळती थांबते व केस दाट होण्यास मदत होते. वडाच्या पानांपासून जेवणासाठी पत्रावळी देखील बनवली जाते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी वडाच्या सालीचा काढा हा उपयुक्त आहे. याचे सेवन केल्यास साखर नियंत्रणात फायदा होतो. सांधेदुखी किंवा पाय मुरगळल्यावर वडाची पाने गरम करुन दुखऱ्या जागी लावल्यास त्वरित आराम मिळतो. पावसाळ्यामध्ये पाणी आणि चिखल यांच्याशी सारखा संबंध येत असल्याने खाज किंवा पायाला चिखल्या झाल्या असतील तर वडाच्या पानाचा चिक लावावा. असे वडाचे विविध उपयोग मनुष्य जीवनाला उपयुक्त आहेत.