मंडणगड वेळास येथे मागील काही वर्षांपासून, दरवर्षी कासव महोत्सव भरवला जातो. यामध्ये समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी उबण्याचा कार्यकाल पूर्ण होऊन त्यातून कासवाची पिल्ले बाहेर येऊन ती समुद्रात जाताना पाहण्याची मजाच काही और असते. शेकडो फोटोग्राफर कासवांच्या पिल्लांची एक झलक दिसण्यासाठी किंवा युनिक काहीतरी टिपण्यासाठी तिथे २-४ दिवस मुक्काम ठोकून असतात.
गेल्या काही वषार्पासून तालुक्याच्या पश्चिम सागरी किनारपट्टीवरील भागामध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. रविवारी राजापूर वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची ६१ अंडी आढळून आली. समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारत असताना कासवमित्र गोकुळ जाधव यांनी ती अंडी पाहिली. त्यांनी त्वरित वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली किनाऱ्यावरच घरटे तयार करून योग्यपद्धतीने त्यांचे संवर्धन केले आहे.
मागील काही महिन्यांमध्ये पर्यावरणामध्ये झालेल्या प्रतिकूल बदलांमुळे यावर्षी सागरी किनारपट्टीच्या वाळूमध्ये अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे आगमन लांबणार की काय ! याबाबत एक प्रकारे प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच दरवर्षीप्रमाणे कासवे अंडी घालण्यासाठी वेत्ये किनारपट्टीवर आली आहेत.
या कासवांचा वीणीचा हंगाम वर्षभर प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च असाच असतो. साधारणतः रात्रीच्या वेळी मादी अंडी घालते. एका वीणीच्या हंगामात १ ते ३ वेळा साधारणतः महिन्याभराच्या अंतराने कासवीण अंडी घालते. एका वेळी १०० ते २०० अंडी घातली जातात. ४५ ते ५५ दिवसांमध्ये हि अंडी नैसर्गिक रित्या उबतात आणि कालांतराने त्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येऊन समुद्राच्या दिशेने ती मार्गस्त होतात. त्यांच्या दोन वीण हंगामातील अंतर साधारण १ ते २ वर्षे एवढे असते. अंडी घालण्याच्या किनाऱ्यावरील जागांचा विनाश होत असल्याने त्यांच्या विणीच्या काळामध्ये काही संकटे निर्माण होतात कि काय अशी चर्चा सुरु होती.