झटपट लाखो रुपये ते ही काही तासात कमवण्यासाठीच रासायनिक सांडपाणी कामथे नदीत ओतण्याचा प्रकार करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून राजकीय वरदहस्त असणाऱ्या ठेकेदारावर प्रशासन कारवाई करणार का ? असा सवाल गावकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर कंपनीकडून कामथे गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावकऱ्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, कामथे नदीत साफीईस्ट कंपनीचे वेस्ट (मळी) सोडण्यात आले होते. ग्रामस्थानी रात्री दोन टँकर अडकवून ठेवले होते. त्यानंतर ग्रामस्थ आणि चिपळूणमधील राजकीयपक्ष आक्रमक होत प्रदूषण महामंडळाविरोधात आक्रमक होत जाब विचारला. मात्र ठोस कारवाई कधी होते हे महत्वाचे आहे. तर प्रशासन ही कशा पद्धतीने कारवाई करते या कडे साऱ्यांचे लक्ष आहे.
विल्हेवाट लावण्याचा ठेका – खरंतर या वेस्टला ग्रामीण भाषेत मळी म्हणून बोलले जाते. हे वेस्ट उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचा ठेका दिला जातो. करोडो रुपयांचा हा ठेका टेंडर पद्धतीने मिळवला जात असून सध्या तो परजिल्हातील एका व्यक्तीकडे असून रोजचे हजारो लीटर वेस्ट वाहून नेले जात आहे.
दिवसाला लाखोंची उलाढाल – हे वेस्ट उचलण्याचा ज्यांना ठेका मिळतो त्याची रोजची उलाढाल लाखोंत आहे, अशी चर्चा सुरू आहे. हे वेस्ट खास करून उसाच्या शेतात टाकले जाते आणि त्यातूनही संबंधितना ऊस उत्पादक पैसे देतो. उग्रवास असणारे हे वेस्ट ऊसाला पोषक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अशा पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, अशी चर्चा आता सुरू आहे.
६ टँकर नदीकिनारी – एका टैंकरला एका दिवसाचे भाडे किमान ४० ते ५० हजार रुपये मिळते अशीही चर्चा सुरू आहे. ६ टँकर भरून कुंभार्ली घाटातून पश्चिम महाराष्ट्रत जातात. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते कंपनीत येतात. म्हणजे एक दिवस पूर्ण निघून जातो. हा वेळ आणि काही तासांत लाखो रुपये मिळवायचे असतील, तर वेस्टची इथेच विल्हेवाट लावण्याची शक्कल लढवली गेली आणि ४ टँकर खाली करून पुन्हा वेस्ट भरायला कंपनीत दाखल झाले, अशी चर्चा सुरू आहे. गावकऱ्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.
झटपट लाखोंचा धंदा – झटपट लाखो रुपयांचा धंदा, तोही काही तासात करण्यासाठी खडपोलीतून टैंकर कामथेमध्ये आणले गेले. लगेच खाली करून पुन्हा भरायचे, असा प्लॅन होता, मात्र तो अयशस्वी ठरला. नदीचे पाणी दूषित झाले. पर्यायाने यावर अवलंबून असणाऱ्या नळपाणी योजनांचे पाणी दूषित झाल्याने कंपनीने सध्या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. पाण्याचा अहवाल येईपर्यंत हा पाणी पुरवठा गावाला कंपनी करणार आहे, असे ग्रामस्थ सांगतात.
कठोर कारवाई होईल ? – राजकीय वरदहस्त असणाऱ्या ठेकेदारावर कारवाई प्रशासन करेल का? आणि कारवाई करणार असेल, तर कशापद्धतीने करेल? हाच प्रश्न साऱ्यांना निर्माण झाला असून कारवाईकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.