परशुराम घाटातील धोकादायक मातीचा भराव आणि तुटलेल्या संरक्षक भिंती तोडून नव्याने भराव करण्यात येणार आहे. तसेच नव्याने संरक्षण भिंत बांधली जाणार आहे. दिवाळीनंतर हे काम सुरू केले जाईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे महाड येथील उपअभियंता अमोल माडकर यांनी “सकाळ’ला दिली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता बनवण्यासाठी केलेल्या मातीचा भराव वाहून गेला आहे. या घटनेमुळे दरीची बाजू धोकादायक झाली आहे. परतीच्या पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास संपूर्ण रस्ता खचण्याची भीती आहे. त्यामुळे परशुराम घाट पुन्हा धोकादायक झाला आहे.
यापूर्वी विविध कारणांसाठी हा घाट अनेकवेळा बंद करण्यात आला होता. परशुराम घाटात अनेक ठिकाणी डोंगरकटाई करून रस्ता बनवण्यात आला आहे. जिथे डोंगरकटाई शक्य नाही, तेथे मातीचा भराव टाकून त्याच्या कडेला संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. पेढे गावानाजीक असलेली ही भिंत आणि मातीचा भराव बुधवारी पहाटे खचला. त्यामुळे या ठिकाणची सुमारे १०० मीटर लांबीची संरक्षक भिंत धोकादायक बनली आहे. रस्त्याच्या खालील मातीचा भरावही वाहून गेला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता धोकादायक बनला आहे.
या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज कंपनीला नोटीस बजावली. त्यानंतर वेगवेगळ्या तज्ज्ञ एजन्सीमार्फत येथील उपाययोजना सुचवल्या आहेत. आज पुणे येथील मेक अँड इझी या एजन्सीचे तज्ज्ञ अभियंते परशुराम घाटात कोसळलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यानुसार कल्याण टोलवेज कंपनीकडून येथे दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.
वाहतुकीवर परिणाम नाही – परशुराम घाटात मातीचा भराव वाहून गेल्यानंतर या घटनेचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. धोकादायक ठिकाणी फक्त एकेरी वाहतूक सुरू आहे. वाहतुकीसाठी घाटातील रस्ता सुरक्षित आहे. धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवली जाईल.