शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी विमानतळाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रिय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या पार्श्वभुमीवर एमआयडीसी, आयआरबी व विमान कंपनीने योग्य प्रकारे नियोजन केले होते. विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर दोन दिवस आधी गोवा ते सिंधुदुर्ग असा अलायन्स एअरच्या विमानाने प्रवासाची टेस्ट घेतली. यावेळी पायलटसह टेक्निकल स्टाफ देखील विमानासोबत हजर होता.
सिंधुदुर्गवासियांप्रमाणेच अख्ख्या कोकणासाठी हि अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. विमान प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी महिन्याभराचे तिकिट बुकिंग फुल्ल झाले आहे. उद्घाटन प्रसंगी एकूण ३ विमाने विमानतळावर उतरली. त्यावेळी आपण पाहिले असेल कि, तिन्ही विमानांवर पाण्याच्या बम्बाने फवारणी केली गेली.
अनेक जणांना या गोष्टीबद्दल आश्चर्य वाटले तर काही सिंधुदुर्गवासीयांनी यावर गजाली मारायला देखील सुरुवात केली कि, एखादी चारचाकी वाहन उन्हात राहिल्यावर तापते आणि मग त्यावर पाणी मारून ते थंड केले जाते, तसेच उन्हातून विमान आल्यामुळे त्याला थंड करण्यासाठी त्यावर पाण्याचा मारा करण्यात आला असेल असा समज झाला. परंतु, शास्त्रीय दृष्ट्या विमान प्रवास करत असलेया भागाचे तापमानच थंड असल्याने या सर्वाची गरज भासत नाही.
शासकीय नियमानुसार कोणत्याही भागामध्ये मंत्री महोदयांचे आगमन झाले तर त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, अम्ब्युलंस आणि पाण्याचा बंब या गोष्टी बंधनकारक आहेत. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी पहिलेच विमान धावपट्टीवर उतरल्यावर त्याच्या स्वागतार्थ म्हणून त्याच्यावर पाण्याचा फवारा मारण्यात आला. हि एक पुर्वापार सुरु असलेली पद्धत असून, पूर्वीच्या काळी बरीचशी वाहतूक हि समुद्रामार्गे असत. त्यामुळे कोणतीही नवीन जहाज प्रवासासाठी समुद्रात उतरवले गेले कि, त्यावर पाण्याची फवारणी करून त्यालाच वॉटर सॅल्युट असे म्हणतात, त्याद्वारे शुभेच्छा देण्यात येत असत. त्यानुसारच हवाई वाहतुकीसाठी सुद्धा हा नियम लागू करण्यात आला.
हवाई वाहतुकीच्या प्रवासामध्ये सुद्धा एखाद्या नवीन विमानाच्या उद्घाटनासाठी किंवा एखाद्या पायलटच्या निवृत्तीसाठी अशा प्रकारचा वॉटर सॅल्युट दिला जातो. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांच्या गजाली हवेतच विरल्या आणि खरे कारण समोर आले.