वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे जिल्ह्यात टंचाई जाणवण्यास सुरवात झाली आहे. सध्या खेड, चिपळूण व लांजा, रत्नागिरी आदी तालुक्यातील पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २९ गावांमधील ५३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. नळपाणी योजना असून देखील जिल्ह्यात आजही काही ठिकाणी पाणी पाणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. बदलते हवामान आणि आटत चाललेले पाण्याचे स्त्रोत यामुळे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात देखील आता पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीसारख्या शहरात एक दिवस आड पाणी करण्यात आले आहे. शहरात अशी अवस्था असेल – तर ग्रामीण भागाचे काय? असा प्रश्न आता साऱ्यांना पडू लागला आहे.सतत पडत असलेला अवकाळी पाऊस यामुळे भुगर्भातील पाणीपातळी बऱ्यापैकी स्थिर राहिली आहे. परिणामी यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी राहील असा अंदाज भुगर्भ तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. परंतु खेड तालुक्यात यावर्षी पहिला टँकर धावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मागील १५ दिवसात पारा वाढला असून प्रचंड उष्मा जाणवत आहे. तापमान ४० अंशावर पोचले आहे. वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईची गावे वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे टँकर धावू लागले आहेत. तर शहरी भागात एक दिवसा आड पाणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

गतवर्षी पाणीटंचाईचा आराखडा ११ कोटी ४१ लाखांवर गेला होता. मात्र यावर्षी जिल्ह्यातील अनेक भागात नळपाणी योजनांची कामे पूर्णत्वास गेल्याने हा आकडा ५ कोटीवर आला असल्याची माहिती जि.प. पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. यावर्षीचा आराखडा ११ कोटींवरून ५ कोटींवर आला असला तरी जिल्ह्यातील २९ गावांची तहान अद्याप भागलेली नाही. मंडणगड तालुक्यात ३ गावातील ६ वाड्यांमध्ये सध्या पाणीपुरवठा टँकरद्वारे केला जात आहे तर दापोली. तालुक्यातील एका गावात पाणीपुरवठा टँकरद्वारे होत आहे. खेड तालुक्यातील १३ गावांमध्ये टँकर धावत असून या टँकरद्वारे ३० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. चिपळूण तालुक्यात ७ गावातील ९ वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.

यावर्षी रत्नागिरी तालुक्यात देखील पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील २ गावातील २ वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर लांजातील ३ गावांमध्ये टँकर धावत असून ५ वाड्यांना त्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आतापर्यंत २९ गावातील ५३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून १७५ टँकरच्या फेऱ्या जिल्ह्यात धावल्या आहेत. सर्वाधिक पाणीटंचाईची झळ ही खेड तालुक्याला बसली असून त्या पाठोपाठ चिपळूण तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.