कोकणाला लाभलेल्या सौंदर्याची जगभरामध्ये सगळ्यांनाच भुरळ पडत आहे. त्यामुळे कोकणामध्ये पर्यटन वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोई सुविधा निर्माण करण्यास शासन प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी वसलेल्या गावाची सुद्धा पावसाळ्यामध्ये होणारा समुद्राच्या लाटांचा त्रास कमी व्हावा, धोका कमी निर्माण व्हावा यासाठी याठिकाणी ३.५ कि.मी. लांबीचा टेट्रापॉड्सचा धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात येणार आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मा. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रत्नागिरी दौरा मर्यादित उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडणार आहे.
रत्नागिरी जिल्हयाला २३८ कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. सागरी लाटा तसेच समुद्रात येणाऱ्या चक्री वादळामुळे सागरी किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धुप होते. मिऱ्या किनाऱ्यावर मोर टेंबे, भाटिमिऱ्या, जाकिमिया, मुरुगवाडा व पंधरामाङ ही गावे वसलेली आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे किनारा हळूहळू नष्ट होत आहे. समुद्र वाडीवस्तीमध्ये घुसत आहे.
सन १९५५ पासुन ते सन २०२१ पर्यंन्त अंदाजे २०० मी. समुद्रकिनारा आतमध्ये सरकला आहे. त्यामुळे जिवीत तसेच वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून याठिकाणी ३.५ कि.मी. लांबीचा टेट्रापॉड्सचा धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यास शासनाने परवानगी दिली आहे. तसेच सात ठिकाणी ग्रोयन्स देखील बांधण्यात येणार आसून ३.५ कि.मी. लांबीचा व ४ मी. रुंदीचा क्राँक्रिट रस्ता तयार करण्यात येणार आहे. या बंधाऱ्यामुळे किनाऱ्याच्या ठिकाणी होणारी धुप कमी होईल.
तसेच भविष्यात मुंबईतील मरीन ड्राइवच्या पार्श्वभुमीवर पर्यटनाच्या दृष्टीने उपाययोजना करुन मिऱ्या गावात पर्यटन क्षेत्र विकसित होऊन स्थानिक लोकांना रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होईल .या बंधाऱ्याबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठा पाठपुरावा केला होता