29.7 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

बोटॅनिकल गार्डनमध्ये १५५ दुर्मीळ फुलझाडे, कोकण आयुक्तांकडून दखल

जिल्हा दौऱ्यावर आलेले कोकण विभागीय आयुक्त सूर्यवंशी...

चिपळूणमध्ये जलकुंडानं साठवलं पाणी, शेती पिकणार सोन्यावाणी

कोकणाला मुसळधार पावसाचे वरदान मिळालेले असूनही उन्हाळ्यात...

मोकाट जनावरांच्या त्रासावर ‘अॅक्शन’ तहसीलदारांनी दिले तात्काळ कारवाईचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात मोकाट गुरांमुळे होणाऱ्या...
HomeLifestyle..तर मुलांना मानसिकदृष्ट्या स‌क्षम बनवा

..तर मुलांना मानसिकदृष्ट्या स‌क्षम बनवा

विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करू नये, असे सरकारी धोरण आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी तर उत्तीर्ण होणारच, असे आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाटणं स्वाभाविक आहे. यामुळे अभ्यास समजावून घेणे, वाचन करणे, चिंतन – मनन करणे या गोष्टी विद्यार्थ्यांपासून फार लांब गेल्या आहेत. अनेक घरांतील आई- वडील दोघेही कामावर जात असल्याने मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसते. नकळतपणे मुलांना मोकळे रान मिळाले आहे. एकत्र कुटुंब पध्दतीचा अभाव असल्याने संस्कारक्षम गोष्टी, अभ्यासाचे महत्व सांगायला घरात कोणी नाही.

सकाळी लवकर उठायची सवय आपण जाणीवपूर्वक लावली नाही, तर आपण नकळतपणे आळशी होण्याच्या सवयीला जवळ करतो. त्याचप्रमाणे अभ्यास वेळच्या वेळी केला नाही तर अभ्यास न करण्याची सवय जडते. त्यामुळे सहजच असे विद्यार्थी हुशार वर्गात मोडण्याऐवजी ‘ढ’ वर्गात कधी जाऊन पोहोचतात, हे त्यांचं त्यांना आणि पालकांनाही कळत नाही.

असा ढकलत ढकलत नववीत आलेला विद्यार्थी अचानक कराव्या लागलेल्या अभ्यासामुळे बिथरून जातो. नेमका अशा वेळी आई- वडिलांचा अभ्यास करण्यासाठीचा दबाव वाढत जातो. अभ्यास जमत नाही, किंवा एवढ्या अभ्यासाची त्याला सवय नाही, हे लक्षात न घेता, मुलाने अभ्यास करावा, यासाठी पालक सर्व प्रयत्न करतात. पण म्हणावे तेवढे यश मिळत नाही. कसाबसा दहावीत पोहोचतो. दहावीत बोर्डाची परीक्षा असते. आता विद्यार्थी आणि पालक या दोघांवरही दबाव असतो. त्यात नातेवाईक मंडळी ‘यंदा दहावीत आहेस ना?’ असं विचारत नकळतपणे मुलांच्या मनावर परिणाम करतात.

प्रत्येकाकडून सहज येणाऱ्या शब्दाचा मुलांच्या मनावर काय परिणाम होतो, याचा विचार करायला ना पालकांना सुचत, ना नातेवाईकांना. फक्त मुलांनी चांगल्या टक्केवारीने पास होणे, एवढीच अपेक्षा पालक व्यक्त करतात. एकीकडे पास होणार की नाही, यांची शाश्वती नसते. अशा परिस्थितीत टक्केवारीचे, पालकांचे अपेक्षांचे ओझे मुलांचे खच्चीकरण करते. मग सुरू होतो डिप्रेशनचा प्रवास, वेगवेगळ्या विचारांचे वादळ. नको नको ते विचार मुलांच्या मनावर परिणाम करतात. त्यातून आत्महत्येचेही टोक गाठले जाते. आपल्या देशात दरवर्षी सुमारे १५ हजार मुले आत्महत्या करतात.

हे चित्र बदलण्यासाठी पालकांनी जबाबदारी घ्यायला हवी. आपल्या मुलांवर दबावतंत्राचा वापर न करता त्यांच्याशी प्रेमाने वागून काय शक्य आहे, याचा विचार करायला हवा. मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुलांना समुपदेशन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पालकांनी स्वतःसाठीही समुपदेशकांचा सल्ला घ्यायला हवा. मुलांच्या क्षमतांचा विचार करायला हवा. क्षमतेनुसार सुरूवातीपासूनच अभ्यासाचे चांगले संस्कार करायला हवेत. पालकांनी शाळेत जाऊन वेळोवेळी अभ्यासाबाबत विचारपूस करायला हवी. यासाठी मूल नववीत जाईपर्यंत थांबणे योग्य नाही. संस्कार सुरूवातीपासूनच सुरू करायला पाहिजेत.

मुलांच्या समस्या आणि क्षमता यांची सांगड घालत मुलांना सक्षम बनवण्यासाठी समुपदेशकांच्या सल्ल्याने पुढे जाता येईल. समुपदेशकामुळे मुलांचा आणि पालकांचा तणाव कमी होईल, विद्यार्थ्यांचा यशापर्यंतचा मार्ग सहज आणि सुखकर होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क
सदाशिव बाळकृष्ण पांचाळ
एज्युकेशनल अॅडव्हायजर
9923590942

RELATED ARTICLES

Most Popular