अश्रुधुराच्या नळकांड्या कशाला फोडतायं…? मारायचेच असेल तर सरळ गोळ्या घाला…..’, अशी तीव्र आणि उद्वीग्न प्रतिक्रिया बारसू रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाविरूद्धचे आंदोलन चांगलेच तापले आहे. स्थानिक नागरिकांनी बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध दर्शविला आहे. माती परीक्षण रोखण्यासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते शुक्रवारी दुपारी अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी म ती परीक्षण जेथे सुरू आहे तेथे जाण्यासाठी कूच केली. मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला.

आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट – सर्वेक्षण स्थळाकडे धाव घेणारे आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीस त्यांच्यामागे धावत होते तर संतप्त आंदोलक सर्वेक्षण स्थळाकडे धावत निघाले होते. अखेरीस या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचा काही आंदोलकांना त्रास झाला. त्यानंतर आंदोलक शांत झाले, असे बोलले जाते.

सरळ मारूनच टाका.. – अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्रास देण्यापेक्षा सरळ मारूनच टाका ना अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका आंदोलनकर्त्याने दिली आहे. आंदोलनस्थळी जाऊ नये यासाठी रोखणाऱ्या पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. अश्रुधुराच्या माऱ्यामळे काहीजण बेशुद्ध पडले. त्यांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल आंदोलकांनी केला आहे.

महिला सरसावल्या – बारसूच्या सड्यावर शुक्रवारी दुपारी अचानक आक्रमक झालेले स्थानिक शेतकरी/आंदोलक आणि पोलिसांची झटापट झाल्याचे चित्र पहायला मिळाले. आंदोलकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या साऱ्या महिला धावत निघाल्या तेव्हा त्यांना रोखण्यासाठी महिला पोलिसांनी पाठलाग सुरू केला. काही महिला पोलिसांनी या महिलांना पकडले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

अश्रुधुराचा मारा – आंदोलक महिलांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की आम्हा महिलांना पोलिसांनी मारले. फरफटत नेले. याशिवाय अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे अनेकजण बेशुद्ध झाले. काहीजण अस्वस्थ झाले. पोलिसांच्या मारहाणीत काही आंदोलक जखमी झाल्याचा दावादेखील या आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे. एकंदरीत घटनास्थळी गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. काही जखमींना उपचारासाठी वैद्यकीय केंद्रातही | नेण्यात आल्याची माहिती आहे.

सरळ गोळ्याच घाला ना..! – आपला संताप व्यक्त करताना आंदोलनकर्त्या महिलांनी सरकार आणि पोलिसांना ठणकावून सांगितले की, आमचा विरोध कायम आहे, कायम राहील. जमीन देणार नाही. काय करायचे ते करा. आम्हाला मारायचेयं… मारून टाका… अश्रूधुर वगैरे कशाला? सरळ गोळ्याच घाला ना, मागे हटणार नाही. पोलीस आम्हाला मारत आहेत. त्यांच्या आया-बहिणी असत्या तर ते असेच वागले असते का? असा सवाल या महिला आंदोलकांनी केला.