रत्नागिरी संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद उद्धव ठाकरे आणि शिंदे गट अशा दोघांत विभागली गेली. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, दापोलीचे आमदार योगेश कदम, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आणि समर्थक शिंदे गटात सामील झालेत. त्यामुळे शिवसेनेला कोकणात मोठे खिंडार पडले. परंतु, शिवसेनेचे जुने आणि अनुभवी शिलेदार मात्र अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम आदींनी नव्या चिन्हासह सेनेची बांधणी करण्यात सुरवात केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव मिळाल्यानंतर काही तासात तसे पोस्टर्स सोशल मीडियावर झळकू लागली आहेत. धगधगती मशाल हे चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळाले आणि अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या ओळींसह मशाल हे चिन्ह घरोघरी पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घाई सुरू झाली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला राजकीय चिन्ह मशाल मिळाल्याचा आनंद चिपळूणमध्ये देखील उत्साहात साजरा केला गेला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेला सध्या तरी याच चिन्हांवर लढवाव्या लागणार आहेत.
कोकणात मशाल हे चिन्हाल विविध प्रकारे महत्व प्राप्त आहे. आजकालच्या तरुण पिढीला याच पेटत्या मशालीच्या प्रकाशात छत्रपती शिवाजी महाराज सैनिकांच्या बैठका घ्यायचे हा इतिहास सांगितला जातो. कोकणात देवीचा गोंधळ घालताना मशाली प्रज्वलित करून, फेर धरला जातो. कोकणातील अनेक किल्ल्यांवर शिवजयंतीच्या निमित्ताने आजही मशाली पेटवल्या जातात. अनेक खेळाडू आणि क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी शिवजयंतीच्या निमित्ताने रायगडावरून पेटती मशाल ज्याला शिवज्योत म्हणतात ती आपल्या परिसरामध्ये घेऊन येतात.