मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी दोन भुयारी मागपैिकी नव्याने वाहतुकीस सुरू केलेला एक भुयारी मार्ग अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी शुक्रवारपासून (ता. २०) वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. हा भुयारी मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबरपासून वाहतुकीस खुला करण्यात आला होता. गतवर्षी गणेशोत्सवात एका भुयारी मार्गातून छोटी प्रवासी वाहने सोडण्यात आली होती; मात्र त्यानंतर पुन्हा तो भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू झाले.
२५ फेब्रुवारीपासून शिमगोत्सवापूर्वीच कोकणात ये-जा करण्यासाठी लहान वाहनांना कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली. पाच दिवसांचे गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीनंतर परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी राष्ट्रीय बांधकाम विभाग आणि स्थानिक वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे कशेडी घाट आणि पर्यायी भुयारी मार्गाच्या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली नाही. पर्यायी भुयारी मार्गावरील गटारलाईन, दर्शनी भाग, संरक्षक भिंत, सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे अपूर्ण आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी उद्यापासून वाहतूक पुन्हा बंद केली जाणार आहे.