अभिमानाने प्रवास करणार, सन्मानाने प्रवास करणार, तिकीट काढल्यावर अभिमानाने प्रवास करणार या अभियानांतर्गत कोकण रेल्वेने सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. जानेवारी २०२४ महिन्यात ९ हजार ५४८ अनधिकृत किंवा अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असून २ कोटी १७ लाख ९७ हजार १०२ रुपये दंड वसूल केला आहे. कोकण रेल्वे प्रशासन गेल्या काही महिन्यामध्ये सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव, दिवाळी, ख्रिसमस, शिमगोत्सव, उन्हाळी सुटीसाठी जादा गाड्या सोडण्यात येतात.
कोकणकन्या, मांडवी, तुतारी यासारख्या नियमित गाड्या भरून जातात. काही वेळेला आरक्षित डब्यात चढून काही प्रवासी इच्छित ठिकाणी जातात. काहीवेळा गर्दीमुळे तिकीट काढले जात नाही किंवा ऑनलाईन तिकिटाची पुष्टी न झाल्यामुळे ते रद्द होते. अशावेळी विनातिकीट प्रवास केला जातो. त्याचा फटका कोकण रेल्वे प्रशासनाला बसत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. ही मोहिम मागील वर्षीं नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आली. ती पुढे कायम ठेवली आहे.
यंदा वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये कारवाई केलेल्या प्रकरणांची संख्या ९ हजार ५४८ असून, २ कोटी १७ लाख ९७ हजार १०२ दंड वसूल केला आहे. तत्पूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये एकूण ६ हजार ६७५ अनधिकृत, अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले होते. त्यांच्याकडून १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपये दंड वसूल केला होता. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १८ हजार ४६६ अनधिकृत व अनियमित प्रवासी तिकिटांशिवाय आढळून आले. त्यांच्याकडून ५ कोटी ६० लाख ९९ हजार ०१७ रुपये दंड वसूल केला आहे.