हल्ला करणाऱ्या बिबट्याशी जणूकाही युध्द खेळत अखेर बिबट्याला लोळविणाऱ्या आशिष महाजन यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान महाजन यांच्यावर हल्ला करणारी बिबट्याची मादी होती. तो जर. का नर बिबट्या असता तर कल्पनाही करता येणार नाही असे काही घडले असते अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. ज्या परिस्थितीत चवताळलेल्या बिबट्याशी आशिष महाजन यांनी दोन हात केले ते ऐकून वन विभागाचे अधिकारी देखील हादरले. तोंडली येथील आशिष महाजन यांच्यावर हल्ला करणारा बिबट्या हा मादी जातीचा आणि फक्त सव्वा वर्षाचा होता. त्याच जागी जर नर जातीचा पाच-सहा वर्षाचा बिबट्या असता तर मात्र अनर्थ घडला असता, असे वन विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान जखमी आशिष महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन चौकशी केली. त्यांची प्रकृती स्थिर असून उपचाराचा खर्च वन विभाग करणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
बिबट्याचा हल्ला – चिपळूण तालुक्यातील तोंडली वारेली गावाच्या सीमेवर असलेल्या आशिष महाजन यांच्या घरासमोर येऊन मध्यरात्री बिबट्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बिबट्याचा हा हल्ला इतका जबरदस्त होता की एक प्रकारे त्याने युद्धच पुकारले होते. महाजन यांच्या शरीराच्या प्रत्येक भागावर त्याने प्रहार करून जखमी केले. रक्तात माखलेले आशिष महाजन पूर्ण धैर्याने त्याचा सामना करत राहिले. ‘एक तर तू राहशील किंवा मी राहीन’ अशा जिद्दीच्या लढाईत अखेर आशिष महाजन जिंकले. त्यांचे धैर्य आणि चिकाटी सम ोर बिबट्याने देखील सपशेल शरणागती पत्करुन प्राण सोडले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिष महाजन यांना डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली.
महाजनांची प्रकृती स्थिर – दरम्यान सोमवारी चिपळूण येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट डेरवण रुग्णालयात जाऊन जखमी आशिष महाजन यांची भेट घेऊन चौकशी केली. तसेच येथील डॉक्टरांशीदेखील चर्चा केली. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी व वन विभाग अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. तसेच आशिष महाजने यांच्या घराची व परिसराची पाहणी देखील अधिकाऱ्यांनी केली. येथील आजूबाजूच्या ग्राम स्थांशीही अधिकाऱ्यांनी संवाद साधत सावध राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
एकांतात घर – यासंदर्भात माहिती देताना संबंधित अधिकारी म्हणाले आमचे त्या परिसरावर नेहमी लक्ष होते. आशिष महाजन यांचे घर पूर्ण एकांतात आहे. आजूबाजूला जंगल आहे. यापूर्वी या परिसरात बिबट्याचा संचार येथे असल्याची माहिती आहे, त्यामुळे आम्ही दोन वेळा त्याठिकाणी जाऊन महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली होती. दक्षतेच्या सूचना देताना काही साहित्य जवळ बाळगण्याचे निर्देश आम्ही दिले होते, अशी माहिती देखील यावेळी अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. शनिवारी मध्यरात्री जे घडले ते भयंकर होते. आशिष महाजन यांचे दैव बलवत्तर होते. त्यांनी प्रतिकार करताना जे धैर्य दाखवले ते अतुलनीय होते. ज्या बिबट्याने आशिष महाजन यांच्यावर हल्ला केला तो मादी जातीचा फक्त सव्वा वर्षाचा बिबट्या होता. त्याजागी जर नर जातीचा पाच सहा वर्षाचा बिबट्या असता तर मात्र अनर्थ घडला असता. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आशिष महाजन यांची प्रकृती आता स्थिर असून ते उपचारांना साथ देत आहेत. त्यांच्या उपचारांचा खर्च वन विभागाकडून करण्यात येणार आहे. अशी माहिती चिपळूण वन विभागाकडून देण्यात आली आहे.