महायुतीच्या विरोधात प्रखर भूमिका घेणारे आमदार भास्कर जाधव विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या तावडीतून सुटले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना घेरण्यासाठी महायुतीने तयारी केली आहे. मतदारसंघातील त्यांची पकड संपवण्यासाठी विरोधकांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ गुहागरमध्ये महायुती विरुद्ध भास्कर जाधव, असे राजकारण तापले आहे. विधानसभा निवडणुकीत जाधव यांचा पराभव करण्यासाठी महायुतीकडून सर्व प्रकारांचे प्रयत्न झाल्यानंतरही ते काठावर विजयी झाले. मागील सभागृहात त्यांना हवे असलेले मंत्रिपद पक्षाने ते दिले नाही. यावेळी निवडून आल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यास सत्ताधाऱ्यांनी विरोध दर्शवला. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात जे लढले त्यातील काहीजण महायुतीत सामील झाले आहेत. काही महायुतीमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गुहागर वगळता जिल्ह्यात महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. त्यामुळे आता गुहागरमध्ये महायुतीच्या जाधवांच्या विरोधात राजकारण सुरू झाले आहे.
माजी मंत्री रामदास कदम आणि भास्कर जाधव यांच्यात उघडपणे संघर्ष सुरू आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम आपल्या आईच्या नावे डान्सबार चालवत असतील, तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. भास्कर जाधव उमेदवारीसाठी माझ्या पाया पडले यांसह अनेक प्रकारांचे आरोप रामदास कदमांनी जाधवांवर केले आहेत. त्याला उत्तर देताना भास्कर जाधवांनी कदमांच्या मी नव्हे तर तेच माझ्या पाया पडल्याचे सांगितले. जाधवांची व्होट बँक कमी करण्यासाठी जातीचे कार्ड वापरले जात आहे. २००५ पासून त्यांच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना विकासकामांचे आमिष दाखवून त्यांच्यापासून फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या समर्थकांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवले जात आहेत. त्यांच्या विरोधात समाजाचे पत्रक काढून मोर्चे काढले जात आहेत. या चक्रव्यूहातून भास्कर जाधव कशी सोडवणूक करून घेतात, याकडे लक्ष आहे. मला संपवण्यासाठी कितीही प्रयत्न झाले, तरी मी सहजासहजी हार मानणार नाही. काळ आणि नियती त्यांना उत्तर देईल. पक्ष अडचणीत असताना मला सोडून जे जात आहेत त्यांच्या ठिकाणी नवीन कार्यकर्ते तयार करेन.