मागील दोन दशकांत बिबट्यांच्या ज्या पिढ्या जन्मल्या त्या पिढ्यांमध्ये जनुकीय बदल झाला असून, जंगल हा अधिवासच ते विसरले आहेत. जन्म झालेले शिवार त्यांनी स्वतःचे अधिवास मानण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा-काजूच्या बागा बिबट्यांचे अधिवास क्षेत्र होत असल्याचे प्राणितज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. चिपळूण डोंगरालगतच्या तालुक्यात लोकवस्तींमध्ये बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. डोंगराळ भागातील आंबा-काजूच्या बागाच नव्हे, तर आदिवासी आणि जंगलक्षेत्राजवळील लोकवस्तीत त्यांचा शिरकाव होत आहे.
लोकवस्तीजवळील जंगले हळूहळू नष्ट होत असून, तिथे इमारती उभ्या राहत आहेत. त्याच्या आजूबाजूला आंबा काजूच्या बागा तयार केल्या जातात. त्याच भागांमध्ये बिबट्याचे वास्तव्य होत आहे. कुंभार्ली, कामथे, परशुराम घाटाजवळील लोकवस्तीलगत बिबट्या सहज वावर होताना दिसतो. अतिरिक्त लोटे एमआयडीसीच्या शेजारील राखीव जंगलात बिबट्यांचा अधिवास आहे. वनविभागाचे कर्मचारी आणि येथील शेतकऱ्यांना बिबट्या मादी पिलांसह अनेक वेळा आढळली आहे. सध्या तिथे खबरदारी घेतली जात आहे; पण बिबट्यांचा वाढता उपद्रव मानव आणि बिबट्याच्या संघर्षाची नांदी ठरत आहे.
बिबट्या हे हिंस्त्र श्वापद; पण चोरटा शिकारी. रानडुक्कर, श्वान, शेळ्या, मेंढ्या हे त्याचे प्रमुख खाद्य. शिवारात हे खाद्य त्याला मुबलक प्रमाणात मिळते. कोणत्याही मार्गान तो आपली भूक भागवतो. चिपळूण, खेड, संगमेश्वर, देवरूख या सह्याद्रीच्या भागात सध्या जेवढे बिबटे वावरत आहेत तेवढे बिबटे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही नाहीत. प्रकल्पातील बिबट्यांची संख्या २५ असेल तर वर्षभर वेगवेगळ्या कारणांमुळे आढळणाऱ्या बिबट्यांची संख्या ५० हून अधिक आहे, असा प्राणीतज्ज्ञांचा अंदाज आहे.
प्रादेशिक वनविभागाच्या क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर अधोरेखित झाला किंवा बिबट्याने शिकार केली, अशी ठिकाणे बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून वनविभागाकडे नोंदली गेली आहेत. चिपळूण, खेड, संगमेश्वर, देवरूख परिसरात गेल्या काही वर्षात अशा क्षेत्रांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. बिबट्या उपाशी असेल तर तो हिंस्र बनतो. भक्ष्याच्या शोधात तो फिरत असतो. भक्ष्य नाही मिळाले तर मानवी वस्तीनजीक जनावरांवर हल्ला चढवतो, असे प्राणितज्ज्ञांचे मत आहे.