येथे गांजा बाळगणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी पकडले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली. काल मिरजोळे-नाचणकर चाळ येथे ही कारवाई झाली. संशयित हा सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्याच्याकडून ४७७ ग्रॅम गांजा आणि रिक्षासह १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. लक्ष्मण रवी नायर (वय ३४, रा. नाचणकर चाळ, मिरजोळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिलेल्या होत्या. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांनी काही पथके तयार केली आहेत. त्यांच्यामार्फत महत्त्वाच्या ठिकाणी गस्त घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
काल (ता. ३) पथक हे रत्नागिरी शहर परिसरात गस्त घालत असताना मिरजोळे-नाचणकर चाळ रत्नागिरी परिसरामध्ये एका रिक्षाचालकाच्या संशयित हालचाली दिसल्या. त्याच्याकडे चौकशी केली असता ही व्यक्ती पोलिस रेकॉर्डवरील आरोपी लक्ष्मण नायर असल्याचे निष्पन्न झाले. त्याची पंचांसमक्ष झडती घेतल्यानंतर पिशवीमध्ये ४७७ग्रॅम गांजासदृश अंमली पदार्थ मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नायर याच्याकडून ४७७ ग्रॅम गांजासदृश अमली पदार्थ व एक ऑटोरिक्षा (एमएच ०८ एक्यू १६६५) असा मिळून एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस ठाणे करत आहे. ही कारवाई स्थानिक शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, गणेश सावंत, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर यांच्या पथकाने केली.