मुसळधार पावसामुळे कोल्हापूर येथील पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे निळे येथे पाणी भरले. रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रात्री ठप्प होती. त्यामुळे कोल्हापूरहून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याने वाहनचालकांची पंचाईत झाली होती. सोमवारी सकाळी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही शास्त्री, अर्जुना, काजळी, जगबुडी नद्या इशारा पातळीवरून वाहत होत्या. पुराचे पाणी किनारी भागात पसरल्यामुळे भातशेती पाण्याखाली गेली होती.
जिल्ह्यात सोमवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १०२.६६ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड ७९, दापोली १००.७०, खेड १०३.५०, गुहागर ६९.९०, चिपळूण १०६, संगमेश्वर ११६.९०, रत्नागिरी ८४.३०, लांजा १४४.१०, राजापूर ११९.५० मिमी नोंद झाली. १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी २११० मिमी पाऊस झाला आहे. रविवारी दिवस-रात्र मुसळधार पावसाने थैमान घातले होते. सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणासह कोल्हापुरमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा नदीला पूर आला होता.
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर निळे येथे पाणी भरले होते. त्यामुळे रविवारी (ता. २१) रात्री या मार्गावरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. निळे येथील पाणी ओसरल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा वाहतूक सुरळीत झाली. आज दिवसभर वाहतूक सुरळीत होती. परंतू अणुस्कुरा आणि आंबोली मार्गे वाहने कोल्हापूरला जात होती. संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस खाडी परिसरात दोन दिवस पुराचे पाणी किनारी भागात स्थिरावलेले आहे.
किनारी भागातील शेती पाण्याखाली गेली असून काही घरामध्ये व दुकान गाळ्यामध्येही पुराचे पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले आहे. पुराचा तडाखा संगमेश्वर बाजारपेठेसह आजूबाजूच्या परिसराला बसला आहे. तसेच काजळी, मुचकुंदी नदीला पूर आला असून नदीचे पाणी इशारा पातळीवर वाहत आहे. निवसर येथे तीन विजेचे खांब, पन्हळेत एक, केळंबेत दोन, खेरवसेत एक खांब पडला आहे. संगमेश्वर पट्ट्यात संततधार पावसामुळे शास्त्री, खेडमधील जगबुडी, राजापुरमधील अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे किनारी भागातील भातशेती पाण्याखाली गेली आहे.