गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये बिबट्याचा राजरोसपणे संचार सुरू असून, रात्रीच्यावेळी बिबट्या फिरत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनासही आले आहे. दोन वर्षांपूर्वी बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याचीही घटना घडली. बिबट्याला ट्रॅप करण्यासाठी त्याचा वावर असलेल्या परिसरामध्ये वन विभागाने दोन ट्रॅप कॅमेरे आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजराही बसवला आहे; मात्र वीस दिवसांनंतरही बिबट्या कॅमेऱ्यामध्ये ट्रॅप झाला नाही की, पिंजऱ्यामध्ये अडकलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील लोकवस्तीमध्ये बिबट्याचा बिनधास्तपणे वावर असल्याचे बोलले जात आहे. दोन वर्षांपूर्वी बिबट्याने पोलिसलाईन परिसरातील कोदवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिला दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची घटना घडली होती. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पोलिस ठाण्यामध्ये घुसून बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा चर्चिले जात आहे.
सायंकाळी बिबट्या बिनधास्तपणे फिरत असल्याचे काही ग्रामस्थांच्या नजरेसही पडले आहे. माजी नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नातून बिबट्याला पकडण्यासाठी शहरामध्ये वन विभागातर्फे पिंजरा बसवण्यात आला आहे. बिबट्याचा संचार शहरामध्ये कोणकोणत्या भागामध्ये आणि कशा पद्धतीने होत आहे हे नेमके समजण्यासाठी माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या मागणीनुसार वन विभागाने दोन ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. पिंजऱ्यामध्ये अद्यापही बिबट्या अडकलेला नाही. बिबट्याचा संचार टिपण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये अद्यापही बिबट्या कॅमेराबद्ध झालेला नाही. लोकांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे.