जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील पोस्ट कार्यालयातील अगदीच्य वर्षभराचे अल्पवयीन पब्लिक रेल्वे आरक्षण सुविधा (पीआरएस) केंद्र बंद करण्याचा घाट रेल्वे विभागाने घातल्याचे समोर आले आहे. यामुळे झेंडे नाचवणारी स्थानिक नेतृत्वे कठपूतळी असल्याची खरमरीत टिका होत आहे. दररोज अपेक्षित तिकिट विक्री होत नसल्याचे दाखवून रेल्वे विभागाकडून तसे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. मात्र दुसरीकडे चारही ठिकाणी असलेल्या पोस्ट आरक्षण सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच रेल्वे विभागाने परस्पर निर्णय घेतल्यास त्या-त्या ठिकाणच्या रेल्वेप्रवाशांचे मोठे नुकसान होणार आहे. सद्या राजापूर वगळता अन्य तीन ठिकाणी रेल्वे आरक्षण सेवा सुरू असून रेल्वे विभागाच्या वक्रदृष्टीमुळे भविष्यात चारही ठिकाणची आरक्षण सेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार दर दिवशी किमान पाच आरक्षणाचे व्यवहार झालेच पाहिजेत असा फतवा जारी करण्यात आला.
त्यानंतर आता रेल्वे विभागाकडून जिल्हयातील चारही ठिकाणी असलेल्या पोस्ट कार्यालयातील आरक्षण सुविधा केंद्र बंद करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत जिल्हा पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्यावतीने ही माहिती समोर आली. चारही पोस्ट सेवेतील सुविधा केंद्रे सुरू रहावीत याबाबत पोस्ट विभाग सकारात्मक असून त्यांच्यावतीने मिळालेल्या माहितीनुसार या विभागाच्या वतीने दिल्ली पर्यंत रेल्वे विभागाशी तसा पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणा- या गाड्यांचे आरक्षण करणे प्रवाशांना सुलभ व्हावे यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर येथे काही वर्षापूर्वी ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र राजापुरात बऱ्याच काळाच्या मागणीनंतर बळेबळेच तशी सेवा सुरू करण्यात आली होती.
अथक प्रयत्नानंतर अवघ्या एक वर्षापूर्वी राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे विभागाच्या वतीने हे आरक्षण सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. तेथे एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला होता. आवश्यक ती सुविधा पुरवण्यात आली होती. अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाल्यामुळे तालुकावासियांमधून सम ाधान व्यक्त होत होते. मागील वर्षभरात प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत होता. मात्र रेल्वे विभागाने अचानक जिल्हयातील चारही ठिकाणी असलेली रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र बंद करण्याचा घाट घातला. त्याला तांत्रिक कारण देखील पुढे केले आहे. कोकण रेल्वे मार्गावर मुख्य शहरांपासून अनेक रेल्वे स्थानके ही दूरवर असून पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा कार्यान्वित असल्याने समस्त प्रवाशांना रेल्वेची तिकिटे सहज उपलब्ध होत होती. जर ही सेवा बंद करण्यात आली तर भविष्यात रेल्वे प्रवाशांवर मोठा अन्याय होणार असून रेल्वे विभागाने जिल्हास्तरीय चारही ठिकाणी कार्यान्वित असलेली पोस्ट कार्यालयातील आरक्षण सुविधा केंद्रे सुरू ठेवावीत अशी जोरदार मागणी जनतेतून करण्यात होत आहे.
राजापूर पोस्ट कार्यालयातील आरक्षण सुविधा केंद्रामधील निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गेल्या आठवडाभराहून अधिक काळ हे आरक्षण केंद्र बंद आहे. तेथे निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यात यावा, शिवाय चांगल्या प्रकारची नेटवर्क सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी राजापूरमधून होत आहे. डबल इंजिनचे सरकार याबाबत दखल घेणार का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.