कोरोना काळामध्ये पहिला लॉकडाऊन झाल्यानंतर साधारण वर्षभर तरी सलून आणि ब्यूटी पार्लरवर निर्बंध घालण्यात आल्याने बंद ठेवण्यात आली होती. या काळात अनेक सलून व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे काही सलून व्यवसायिकांनी आंदोलन करत सलून व्यवसाय लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली होती. त्यांची मागणी मान्य करून केस कापणं, दाढी करणं येत्या १ मे पासून महाग होणार आहे. सलून आणि ब्यूटी पार्लर असोसिएशनने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून केस कापणे आणि दाढी करण्याचा किंमतीमध्ये तब्बल ३० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सलून आणि ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष आणि नाभिक समाजाचे नेते सोमनाथ काशिद यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. सलून-ब्यूटी पार्लर व्यवसायिकांची नुकतीच राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत ३० टक्के भाववाढीबाबत निर्णय झाला. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ मे पासून करण्यात येणार असल्याचे सोमनाथ काशिद यांनी सांगितले आहे.
बऱ्याच दिवसांपासून वाढत्या महागाईनुसार दरवाढ झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी सलून आणि ब्यूटी पार्लर असोसिएशनकडे सातत्याने केली जात होती. या करण्यात आलेल्या दरवाढीच्या निर्णयावर सर्व नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन सलून आणि ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केलं आहे. अनेक सलून व्यवसायिकांचे दुकान हे भाड्याचे होते. त्यामुळे त्यांना जमा पुंजीतून घरातून दुकान भाडं द्यावं लागत होतं. या सगळ्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर सलून व्यवसायिक आक्रमक झाले होते. अखेर त्यात दरवाढ करण्यात आली.