तालुक्यातील कोंडगे येथील लघु पाटबंधारे योजनेच्या बुडित क्षेत्र सांडवा प्रकल्प आणि पुच्छ कालव्यासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या प्रकरणात लाखोंचा भ्रष्टाचार झाला आहे. ७४० गट नंबरच्या ६५ गुंठ्याच्या जागेसाठी ४५ लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि ६९० या आपल्या जागेच्या ६३ गुंठे जागेसाठी अवघी ४ लाख रुपयांची बोली रक्कम मंजूर करण्यात आली असल्याचे गंगाधर कोंडगेकर यांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही मोबदला वाटप करू नये, अशी मागणी देखील गंगाधर कोंडगेकर यांनी केली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन एजंटांनी भरमसाट मोबदला हडप करून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही भूसंपादनाचा मोबदला अदा करू नये, अशी मागणी कोंडगे येथील गंगाधर कोंडगेकर यांनी केली आहे. या बाबतची तक्रार त्यांनी उपविभागीय अधिकारी राजापूर यांच्याकडे केली आहे. याबाबत माहिती देताना ग्रामस्थ कोंडगेकर यांनी सांगितले की, कोंडके येथे बुडित क्षेत्र सांडवा प्रकल्प आणि पुच्छ कालव्यासाठी भूसंपादन लघुपाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. जागा व तिचे क्षेत्रफळ त्यामध्ये बराच फरक दिसून येत आहे. संपादित केलेल्या जागेची २०१३ नंतर गावातील व गावाबाहेर काही व्यक्तींनी जमिनी खरेदी करून त्या जागेत काजूच्या झाडांची लागवड केली आणि त्यानंतर खरेदी केलेल्या जागेची भरसमाट रक्कम मंजूर करून घेण्यात आली आहे, असा आरोप कोंडगेकर यांनी केला आहे.
ज्या गरीब शेतकऱ्यांची एक ते दोन हेक्टरपर्यंत जमीन बुडित क्षेत्रात गेली त्यांना तुटपुंजे रकमेचा मोबदला रक्कम मंजूर करण्यात आला. ज्या पाटबंधारे विभागाने जमीन संपादित केली तिचा सर्वे करताना कमी-जास्त प्रमाणात गुंठ्याचे क्षेत्र दाखवून काही गरीब शेतकऱ्यांच्या पूर्ण जमिनी बुडित क्षेत्रात गेलेल्या असताना त्या निम्म्या व त्याहून कमी प्रमाणात दाखवण्यात आल्या. काही लोकांच्या जमिनी कमी प्रमाणात असताना त्यांना मात्र भरमसाट रक्कम मोबदला मंजूर करण्यात आली आहे. संपादित जमीन व त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात झाडांची लागवड दाखवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कोंडगेकर यांनी सांगितले.