रत्नागिरी आणि लगतच्या परिसरामधून हल्ली थोड्या थोड्या दिवसाच्या फरकाने, वन्यजीवांची कत्तल करून त्यांचे अवयव तस्करी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे निदर्शनास येत आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली काही महिन्याच्या कालावधीमध्येच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अनेक वैयक्तीक व वन विभागासोबत एकत्रित कारवाया केल्या असून आरोपींना शिताफीने पकडले आहे.
दि. ०१/१०/२०२१ रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला बावनदी ते पाली या रस्त्यावरुन खवल्या मांजराच्या खवलांची बेकायदेशीर वाहतुक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, खवल्यामांजराची शिकार करणे तसेच त्याअनुषंगाने होणा-या सर्व बेकायदेशीर व्यवहारास वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये बंदी घालण्यात आलेली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस अंमलदारांनी सापळा रचून, बावनदीकडे जाणा-या बायपास रोडवरुन बावनदी दिशेकडे होंडा युनिकॉर्न मोटार सायकलवरुन येणाऱ्या एक संशयित इसमाला थांबवले, त्याच्या पाठीवर सॅक होती. त्याचा संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव राकेश रामचंद्र धुळप असे सांगितले.
त्याच्या पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये एकूण ४ किलो ३३६ ग्रॅम वजनाची खवल्या मांजराची खवले आढळून आली. या खवल्या मांजरा व्यतिरिक्त पोलीसांनी एकूण रु. ३०,१००/- किं.ची वरील मोटारसायकल व सॅक, मोबाईल असा माल जप्त केला आहे. सदर प्रकरणाबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोह शांताराम झोरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी राकेश रामचंद्र धुळप यास अटक करुन दि. ०२/१०/२०२१ रोजी मा. न्यायालयात हजर केले असता त्यास दि.०५/१०/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी बजावण्यात आली आहे.