आर्थर रोड तुरुंगात अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपी असलेल्या आणि नेहमीच चर्चेत असलेल्या कैद्यानेच दुसऱ्या कैद्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दुष्कर्म करणाऱ्या कैद्याला अटक करण्यात आली आहे. विविध लहान मोठे गुन्हे करणाऱ्या आरोपींना या जेल मध्ये ठेवण्यात येते.
ओशिवरा येथील रहिवासी असलेला आणि गोवंडी येथे राहणारा अशा दोन आरोपींना तुरुंगात एकत्र ठेवण्यात आले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर १९ वर्षीय कैद्याने २० वर्षीय कैद्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. कैद्याने या घृणास्पद प्रकाराची तक्रार केल्यानंतर तुरुंग प्रशासनाने अत्याचार करणाऱ्या कैद्याला ताब्यात घेतले. याबाबत रीतसर पत्राद्वारे ना. म. जोशी मार्ग पोलिसांना कळवल्यानंतर त्यांचे पथक तुरुंगात पोहोचले.
आरोपी कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार, मारहाण करणे, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या आरोपी कैद्याला एका गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीनंतर त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. या प्रकारामुळे पुन्हा एकदा कैद्यांच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विविध गुन्ह्यातील अनेक गुन्हेगार या जेलमध्ये आहेत. अनेक वेळा कैद्यांची आपापसात होणाऱ्या भांडणांमुळे त्यांना वेगवेगळ्या कक्षात ठेवण्यात येते. परंतु तरीही अनेक कैदी भांडण आणि मारामारी यामुळे जेल प्रशासनाच्या नाकात दम आणतात. तर काही वेळा कैदी एकत्र येऊन जेलर वर सुद्धा हल्ला चढवतात, त्यांमुळे अनेक वेळा जेल कर्मचाऱ्यांच्या सुद्धा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.