अनेक दिवस दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन होणार कि ऑफलाईन याबाबत संभ्रमाची अवस्था होती. परंतु आत्ता दिर्घ चर्चेनंतर, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.
पुढे ते म्हणाले, ७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ४० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटं अधिक वेळ दिला जाईल. कोरोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
मुख्याध्यापक, विषयतज्ञ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या काळात होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत तर प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचणी निर्माण झाल्यास ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील. कोरोनोमुळे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी मंडळ परीक्षा शुल्क आकारणार नाही.
त्याचप्रमाणे, कोरोनामुळं या वर्षी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथं परीक्षा उपकेंद्र घेण्याचं निश्चीत करण्यात आलं आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो तिथंच परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना तणावाशिवाय परीक्षेला सामोरं जाता येतं. ज्या शाळेमध्ये १५ पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असतील तिथे जवळच्या शाळेतील परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.