गेल्या वर्षभरात राज्यातील उद्योगांमध्ये १ लाख १८ हजार ४२२ कोटींची परदेशी गुंतवणूक झाली. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. एमआयडीसीच्या पुढील वर्धापन दिनापर्यंत १० हजार कोटींचा प्रकल्प रत्नागिरीत असेल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. एमआयडीसीच्या ६१ व्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची परदेशी गुंतवणूक आणू शकलो.’ यात एमआयडीसीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे.
दावस येथे झालेल्या सामंजस्य करारापैकी १ लाख ६ हजार उद्योगांना जागा दिली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत धन्यवाद देतो. निश्चितच ते सत्काराला पात्र आहेत. सर्वसामान्य माणसाला त्रास होता कामा नये, हे एमआयडीसीने जपले आहे. मानसिकता असेल तर काय किमया होऊ शकते, हे एमआयडीसीने दाखवून दिले आहे. स्थानिकांना प्राधान्याने काम दिले पाहिजे, त्यांना जगवलं पाहिजे. कोणत्याही घटकाला वंचित ठेवू नये, अशी भूमिका उद्योजकांनी घेतली पाहिजे. इथून पुढेही एमआयडीसीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शांतपणे व तन्मयतेने काम करावे. “
शैक्षणिक क्षेत्रात उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिवमूर्तीच्या पूजनाने आणि दीपप्रज्ज्वलनाने झाली. प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांनी कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक केले. तसेच कार्यकारी अभियंता सचिन राक्षे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपअभियंता बी. एन. पाटील, माजी जि. प. सदस्य महेश ऊर्फ बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, उद्योजक संस्थेचे प्रतिनिधी के. बी. भट, राजेंद्र सावंत, दिगंबर मगदूम आदी उपस्थित होते.
अनेकांना कायम केले सामंत – एमआयडीसीच्या वर्धापनदिनाला दस्तुरखुद्द उद्योगमंत्री उपस्थित असल्याची इतिहासातील पहिलीच वेळ आहे. आपण सर्व कुटुंब आहे आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. भविष्यात येणाऱ्या या प्रकल्पांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. एमआयडीसीमध्ये ३८ कर्मचारी ठेकेदारी पद्धतीवर आहेत. त्यापैकी अनेकांना कायम केले आहे. उर्वरित १५ जणांना लवकरच कायम करू, असे आश्वासनही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.