रत्नागिरी जिल्ह्यात १० लाख लसीकरणाचा टप्पा पार झाला आहे. तिसरी लाट आल्यावर त्याचा विपरीत परिणाम जाणवू नये, यासाठी सर्वांनी लस घेणे गरजेचे आहे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून, बोर्डिंग रोड येथील देसाई अध्यापक विद्यालयामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
लसीकरण दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेमध्ये केले जाणार आहे. रविवारी सुद्धा लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. येथे ऑनलाईन आणि ऑनस्पॉट नोंदणी करणाऱ्यांना मोफत लस देण्यात येणार आहे. नोंदणी करताना आपणास सशुल्क म्हणजेच पेड जरी दिसले, तरी सर्व लसीना कोणताही सेवाशुल्क आकाराला जाणार नाही, ती पूर्णपणे मोफत आहे. याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी केले आहे.
शहर व लगतच्या गावांमधील ग्रामस्थांसाठी दिवसाला किमान २०० च्या मागणीनुसार शिबिरे घेण्यात येणार असून, यासाठी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटने कोव्हीशिल्ड लस पूर्णपणे मोफत दिली आहे. समाजातील तळागाळात लसीकरण पोहोचण्यासाठी गोरगरीब जनतेला ही लस पुरवली जाणार असल्याची माहिती माजी आमदार सुरेंद्र तथा बाळ माने यांनी दिली आहे.
सिरम इन्स्टिट्यूट, पुणे , बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, कोंढवा, पुणे, प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स,पुणे, दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेज, मुकुल माधव फाउंडेशन, पुणे, पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान पुणे, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, पुणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, दक्षिण रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोफत कोविशिल्ड लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती माने यांनी दिली. १, २, आणि ३ ऑक्टोबर २०२१ रोजी असणाऱ्या लसीकरणाकरिता ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून नियोजित वेळ ठरवून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांनी दि यश फाउंडेशन, रत्नागिरी या केंद्राअंतर्गत ऑनलाईन नाव नोंदणी करून घ्यावी.
श्री. बाळ माने यांनी सांगितले, मोफत लसीकरण करण्याचे मोठ उद्दिष्ट समोर ठेवले आहे. सध्या पाच हजार लसी उपलब्ध झाल्या असून, मागणीनुसार त्यांचा थेट पुरवठा करण्यात येणार आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा.