राजापूर-लांजा- संगमेश्वर विधानसभा मतदार संघात मोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व लांजा तालुक्यातील भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन केंद्राच्या मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी आ. राजन साळवी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या योजनेतून नवीन इमारतींसाठी तसेच कर्मचारी निवासस्थानी बांधकामासाठी १२ कोटी ४४ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती आ. साळवी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक गावातील रूग्ण व त्यांचे नातेवाईक ये-जा करीत असतात. परंतू खूप वर्षे जुनी असलेल्या जैतापूर व भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत.
तसेच कर्मचारी निवासस्थानेही मोडकळीस आल्याने रूग्ण त्यांचे नातेवाईक तसेच येथील वैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचारीवर्गात असुरक्षितता आहे. या गंभीर बाबींच्या पार्श्वभूमीवर आ. राजन साळवी यांनी इमारतींची डागडुजी न करता नवीन इमारतीसाठी शासन निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांप्रती निधीची तरतूद होण्यासाठी आ. साळवी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीसाठी व कर्मचारी निवासस्थान बांधकाम ासाठी १२ कोटी ४४ लाख रूपये इतका निधी उपलब्ध झाला आहे.
या नवीन इमारतींच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून नजिकच्या काळात या इमारतींच्या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याचे आ. साळवी यांच्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मतदारसंघातील गोरगरीब जनतेच्या आरोग्यविषयक बाबींसाठी प्राधान्य दिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची ही इमारत आता अद्ययावत होणार असून येथे येणारे रूग्ण, त्यांचे आप्त, वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचा-यांना यामुळे अधिक सुसह्यता अनुभवता येईल तसेच कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामामुळे कर्मचा-यांची गैरसोय दूर होईल असा विश्वासही या पत्रकाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.