तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर राबवण्यात येणाऱ्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेंतर्गत कासवमित्रांच्या विशेष सहकार्याने ४७ सागरी कासवपिल्ले समुद्रात सोडण्यात आली. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अंडी उबवणी केंद्रात सुमारे १३७ समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती. त्यातील ४७ कासवांची पिल्ले सुरक्षित समुद्रात सोडण्यात आली आहेत. गणपतीपुळे येथे समुद्रकिनाऱ्यावर कांदळवन दक्षिण विभाग परिक्षेत्र रत्नागिरीच्या वतीने सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहीमअंतर्गत अंडी उबवणी केंद्रामध्ये कासवांच्या संरक्षित प्रजाती तयार केल्या जात आहेत. त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या घरट्यांमधील सुमारे ४७ कासवांची पिल्ले संरक्षित करण्यात आली होती.
या पिल्लांना सुरक्षितरीत्या गणपतीपुळे अंडी उबवणी केंद्रासाठी नियुक्ती करण्यात आलेले कासवमित्र वीरेंद्र सुर्वे व मालगुंड येथील कासवमित्र आदित्य मयेकर यांच्या विशेष कामगिरीने गणपतीपुळे समुद्रात सोडण्यात आली आहेत. या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या केंद्रामध्ये सुमारे १३७समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती. त्यातील ४७कासवांची पिल्ले सुरक्षित समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती सुर्वे यांनी दिली आहे. या केंद्रामध्ये पिल्ले घरट्यांमध्ये योग्य प्रकारे संरक्षित करण्यासाठी सुर्वे व मयेकर यांच्यावतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांकडून पाहणी – गणपतीपुळे किनारी ऑलिव्ह रिडले कासवं अंडी घालण्यासाठी येतात, हे लक्षात आल्यानंतर यंदा कांदळवन कक्षाने नव्याने हॅचरी सुरू केली आहे. प्रथमच अंडी संवर्धन केलेल्या गणपतीपुळे किनाऱ्यावर कासवांचे जतन योग्य पद्धतीने केले जाते किंवा नाही, याची पाहणी कांदळवन कक्षाचे अधिकारी किरण ठाकूर यांनी केली. कासव संवर्धनातील त्रुटींबाबत काही महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.