रत्नागिरीत पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळच्या धर्तीवर राई-भातगाव येथे खाडीमध्ये टुरिस्ट हाउसबोट लवकरच सुरू करण्यात येणार आहे. १ कोटींची हाउसबोट उमेदच्या महिला बचत गटांना चालविण्यास देण्यात आली असून त्यामधून वर्षाला गटाला सुमारे १० ते १५ लाख नफा मिळेल, असे नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिली. सिंधुरत्न योजनेतून रत्नागिरी जिल्ह्याला प्रत्येकी एक कोटीची याप्रमाणे पाच हाउसबोटी विकत घेण्यात येणार आहेत. त्यातील एक हाउसबोट दाखल झाली असून त्याची चाचणी घेतली जात आहे. यामधून रत्नागिरीजवळील खाड्यांची सैर घडविण्यात येणार आहे.
येथील कांदळवन आणि समुद्रालगतच्या खाडी परिसरातील कोकण परजिल्ह्यातील पर्यटकांना पाहायला मिळणार असून, याद्वारे, रोजगारही मिळणार आहे. जलपर्यटनावर आधारित व्यवसाय उभे राहावेत, अशी संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी मांडली होती. त्यासाठी उमेदच्या महिलांना प्रशिक्षणही दिले गेले. रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीतील राई भातगाव दरम्यान पर्यटकांना फिरवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. या परिसरातील कांदळवन, पक्षी, मासे, विविध झाडे पाहण्याची संधी यामुळे मिळणार आहे.
फिश मसाजसह मासे पकडा – राई ते भातगाव पूल हा सुमारे २२ किलोमीटरचा परिसर आहे. या परिसरात कांदळवनातील जैवविविधतेचे दर्शन घेता येणार आहे. खाडीकिनारी असलेली पुरातन मंदिरे कोकणी कला पाहण्याची संधी पर्यटकांना मिळू शकते. फिश मसाजसह मासे पकडण्याचा आनंद पर्यटक घेऊ शकतात, असे नियोजन केले गेले आहे.