प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल अनुदानात ३५ हजारांची वाढ केली आहे. त्याबरोबरच मोफत विजेसाठी सौर पॅनेलकरिता शासनाने १५ रुपये हजार अनुदान देऊ केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांची वाढ मिळणार आहे. या या योजनेचा २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यातील मंजूर झालेल्या सुमारे १७ हजार घरकुलांना लाभ मिळणार आहे. गरजूंसाठी शासनातर्फे घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान घरकुल बांधकामासाठी दिले जाते; मात्र, हे अनुदान कमी पडत असल्यामुळे त्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून, नव्या निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना एक लाख ७० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
शासन अनुदानातून घरकुल उभारणी झाली असली तरीही भरमसाठ येणाऱ्या वीजबिलाने सर्वसामान्य हैराण होतात. महागाईत घरखर्च चालवताना कसरत करावी लागत असताना त्यात वीजबिलाचाही बोजा सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. त्यावर सौरपॅनेलचा तोडगा शासनाने काढला आहे. त्यामध्ये सौरपॅनेलसाठी शासनाकडून अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षामध्ये सुमारे १९ हजार घरकुल मंजूर झाली आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील २ हजार २६२ घरकुलांचा समावेश आहे. त्या मंजूर झालेल्या घरावर सौरपॅनेल बसणार असून, त्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत वीज मिळणार आहे. त्यामुळे या योजौंचा लाभ घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे.