अकरावी प्रवेशप्रक्रिया सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. अकरावीसाठी प्रथमच ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. प्रवेशाची प्रथम यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३३८ महाविद्यालयांत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या २४ हजार ६४० जागा आहेत. आतापर्यंत ६ हजार ५०९ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. यावर्षी राज्यमंडळाने दहावीचा निकाल दरवर्षीच्या तुलनेत लवकर जाहीर केला. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा होती; परंतु तांत्रिक अडचणीमुळे प्रवेशप्रक्रियेला विलंब झाला. पहिल्या प्रवेशयादीत ६ हजार ५०९ विद्यार्थ्यांची निवड झाली असली तरी अद्याप १८ हजार १३१ जागांवर प्रवेशप्रक्रिया होणार आहे.
शिक्षण विभागातर्फे दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले असून, विद्यार्थ्यांना १०ते १३ जुलैपर्यंत प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. पहिल्या फेरीअंतर्गत घोषित झालेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी ७जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. रिक्त जागेसाठी प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रथम पसंती विज्ञान शाखेसाठी आहे. द्वितीय पसंती वाणिज्य तर तृतीय पसंती कला शाखेसाठी आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे प्रवेशाबाबत साशंक असलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. यावर्षी शासकीय तंत्रनिकेतनासाठी विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील प्रवेशाचे चित्र – महाविद्यालयीन प्रवेशामध्ये पहिल्या ऑनलाइन फेरीत तीन शाखांमध्ये कला शाखेत ७ हजार ४४० जागा, त्यामध्ये १ हजार ५७३ जागा वाटप. वाणिज्य शाखेसाठी ९ हजार ३२० जागा त्यामध्ये २ हजार ३५७ जागा वाटप, तर विज्ञान शाखेसाठी ७ हजार ८८० उपलब्ध जागा त्यामध्ये २ हजार ५७९ वाटप झाल्या आहेत. अद्याप १८ हजार १३१ विद्यार्थी आकारवी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.