कोकणातील अनेक किनारी भागामध्ये मागील काही वर्षापासून ऑलिव्ह रिडले कासवं विणीच्या हंगामात दाखल होतात. अंडी घालून गेली की, त्याचे योग्यप्रकारे जतन न झाल्यामुळे त्यातून कासवांची पैदास होण्याचा टक्का घाटात चालल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. वनविभागाच्या कांदळवन कक्षामार्फत कासव संवर्धनासाठी पावले उचलण्यात येत आहेत.
पावसाचा काळ आत्ता संपला असून, थंडीच्या कालावधीत कासवांच्या विणीचा हंगाम वेळेमध्ये सुरू होईल, असे चिन्ह दिसू लागले आहे. वेळास ता. मंडणगड समुद्रकिनारी राज्यातील पहिले कासवाचे घरटे आढळून आले आहे. जिल्ह्यात सुमारे १४ सागरी किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी वनविभागाच्या सहकार्याने पावले उचलण्यात आली आहेत.
गतवर्षी विणीचा हंगाम पुढे गेला होता; मात्र यंदा कासव विणीसाठी वेळेत दाखल होणार असल्याने कासवमित्रही सज्ज झाले आहेत. त्यानुसार गेल्या काही वर्षात विणीसाठी कासव येत असलेल्या किनाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी स्थानिक कासव मित्रांची फौज तयार करण्यात आली आहे. मंडणगडपासून राजापूरपर्यंतच्या किनाऱ्यांवर सुमारे १४ ठिकाणी कासवांचे संवर्धन केले जाते. त्यात वेळास येथे काही वर्षांपासून कासव महोत्सवाचेही आयोजन केले जाते. या ठिकाणी कासवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवतात. त्यामुळे स्थानिकांना येथे पर्यटनाची जोड मिळाली आहे.
गतवर्षी मोसमी पावसाचा मुक्काम लांबला आणि प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाची संततधार होती. त्यामुळे कासवांचा विणीचा हंगाम पुढे गेला. नोव्हेंबर महिन्यात विणीसाठी येणारी कासवं गतवर्षी जानेवारी, फेब्रुवारीला दाखल झाली. त्यामुळे अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्याचा कालावधीही तेवढाच पुढे गेला. उन्हाळ्यामध्ये अंड्यांचे संरक्षण करण्याचे कासव मित्रांपुढे मोठे आव्हान होते.
वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार विविध उपाययोजना करून कासवमित्रांनी उन्हापासून अंड्यांचे संरक्षण केले. गावखडी येथे गतवर्षी सुमारे साडेचार हजार अंडी होती. त्यातील तीन हजारहून अधिक अंड्यातून पिल्ले बाहेर पडली. कासवमित्रांमुळे तिप्पट अंड्यांचे संरक्षण होऊ शकले. यंदा मोसमी पावसाने निरोप घेतला असून अवकाळीचेही संकट दिसत नाही. राज्यातील ही पहिली नोंद आहे.