सावर्डे मोहल्ला येथे घरात गांजा या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन सख्या भावाना सावर्डे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अर्धा किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात जाला आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात जोरदार मोहिम सुरु केली असून गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी छापा टाकून, सापळा रचून गांजा पकडला आहे. या पार्श्वभूमिवर सावर्डे येथे कारवाई करण्यात आली. सावर्डे परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी परराज्यातील अनेक कामगार या परिसरात राहतात. त्यांच्यापैकी काहीजण अमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसाना आढळले होते.
पोलिसांनी त्यांच्यावर तसेच अमली पदार्थ पुरवणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई केली होती. काही दिवसानंतर पुन्हा अमली पदार्थाची खरेदी विक्री सुरू होऊ नये यासाठी सावर्डे पोलिस संशयितांवर सातत्याने नजर ठेवून होते. दोन दिवसापूर्वी संशयित एक व्यक्ती गांजा सेवन करताना पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पोलिसानी अधिक तपास केल्यानंतर दोन सख्ख्या भावांनी अंमली पदार्थ विकत असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकला असता सुमारे ५०० ग्रॅम गांजा सापडला. सावर्डे पोलिसांनी २ संशयित आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास सावर्डे पोलीस करत आहेत.