कुंभारखणी बुद्रुक येथील पाझर तलावामध्ये सोमवारी २ सांबरं मृतावस्थेत आढळली. ही घटना कळताच वनविभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. कोळशिंदेच्या हल्ल्यात या सांबरांचा मृत्यू ओढवला असावा असा कयास प्रथमदर्शनी वर्तविण्यात येत आहे. या घटनेबाबत परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) प्रकाश सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी १७ एप्रिल रोजी कुंभारखणी बुद्रुक येथील पाझर तलावामध्ये २ सांबरं मृतावस्थेत सापडल्याचे मंगेश बबन सुर्वे यांनी वनखात्याला दूरध्वनीवरून कळविले. त्यानंतर प्रकाश सुतार यांनी संगमेश्वरचे वनपाल तौफिक मुल्ला, आरवलीचे वनरक्षक आकाश कडूकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. २ सांबरं पाण्यावर तरंगत होती. दोन्ही सांबरांचे मृतदेह वन अधिकाऱ्यांनी गावच्या सरपंच गीताताई सुर्वे, उपसरपंच अनिल सुर्वे, माजी उपसरपंच दिलीप सुर्वे, पोलीस पाटील राकेश सुर्वे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याबाहेर काढले. या दोन्ही सांबरांचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग खाल्ला असून उर्वरित भाग पूर्णपणे कुजला होता. दुर्गंधी पसरली होती. पशुवैद्यकीय अधिकारी कदम यांनी दोन्ही सांबरांची तपासणी केली.

मृत्यू नेमका कोणत्या कारणांने झाला याचा तपास केला जात आहे. तलाव परिसरात कोळशिंदे, बिबट्या, रानडुक्कर इत्यादी वन्यप्राण्यांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही सांबरांचा मृत्यू कोळशिंदेच्या हल्ल्यात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या ठिकाणी कोळशिंदे आणि बिबट्याची विष्टा दिसून आली आहे.दरम्यान, वन्यप्राण्यांपासून खबरदारी म्हणून या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच या २ सांबरांच्या मृत्यूविषयीचा गुन्हादेखील नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहाय्यक वन संरक्षक (प्रा) रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलाख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, संगमेश्वरचे वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक आकाश कडूकर करत आहेत. दरम्यान, अशाप्रकारच्या वन्यजीवांमुळे नागरिक अडचणीत सापडल्यास त्यांनी वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९४२१७४१३३५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.