पुणे बालेवाडी येथे नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या रत्नागिरीतील प्रसिद्ध नेमबाज पुष्कराज इंगोले हा मित्रासह शिकारीला गेलेला असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राजापूर तालुक्यातील कशेळी बांध येथे रंगेहात पकडले. त्याच्याकडून मारलेला डुक्कर जप्त करण्यात आला असून याप्रकरणी नाटे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी झाडगाव एमआयडीसी येथे पुष्कराज जगदीश इंगोले (वय ३६) व जाकीमिऱ्या येथील त्याचा मित्र रोहन रामदास बनप अशी या संशयित आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. नाटे पोलिसांनी याबाबत पत्रकारांना दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, हे २ संशयित आरोपी सॅन्ट्रो गाडी घेऊन कशेळी गावाकडील परिसरात शिकारीसाठी गेले होते. शनिवारी रात्री १२ वाजता शिकार करून  रत्नागिरीच्या दिशेने येत होते. त्याचवेळी जिल्ह्यातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी गस्त घालत राजापूरच्या दिशेने जात होते.

या पथकाला कशेळी बांध परिसरात सॅन्ट्रो गाडी संशयास्पदरित्या उभी असलेली दिसली. त्यांनी चौकशी केली असता सिंगल बॅलर बंदूक दिसून आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गाडीची झडती घेण्यात आली. यावेळी गाडीमध्ये मेलेला डुक्कर आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून संशयित आरोपी पुष्कराज जगदीश इंगोले आणि रोहन रामदास बनप यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३, १२५ वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये नाटे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला पुष्कराज इंगोले याने दोन महिन्यापूर्वी बालेवाडी येथे नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले होते. इंगोले याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.