चार वर्षांपूर्वी घर सोडुन पुण्याला गेलेल्या आईच्या आठवणीने व्याकूळ झालेली मुलं कुणालाही काही न सांगता घराबाहेर पडली… मुलं घरातून अचानक निघून गेल्याने मोठी खळबळ उडाली. घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरु केली होती. मात्र दैव बलवत्तर म्हणून योगायोगाने ही मुले राजापूर एसटी स्टँड समोर एका बाजूला बसलेली राजापुरातील महिला पोलिसांच्या दामिनी पथकाला दिसली आणि पुढचा अनर्थ टळला. महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने सतर्कता दाखवत चौकशी करून त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात सुरक्षितरित्या दिले. पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी लांजा तालुक्यातील वाघण बौद्धवाडी येथील राहणारी कुमारी साघवी महेंद्र जाधव, यथात महेंद्र जाधव ही दोन मुले सोमवारी संध्याकाळी राजापूर एस.टी. डेपो समोर एका बाजुस बसलेली पोलिसांना दिसली. यावेळी राजापूर पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार हर्षदा चव्हाण व महिला पोलीस कॉन्स्टेबल सुषमा स्वामी यांनी या मुलांकडे विचारणा केली. यावेळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.
आईच्या आठवणीने व्याकूळ – दामिनी पथकातील पोलिसांनी यावेळी मुलांची विचारपूस केली तेव्हा आमची आई चार वर्षापुर्वी घर सोडुन गेली आहे ती पुणे येथे असुन आम्हाला तिची आठवण येत असल्याने तिच्याशी संपर्क करुन आम्ही पुणे येथे जात आहोत, असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी त्यांना त्यांच्या वडीलांचे नाव विचारले असता महेंद्र गणपत जाधव (रा.वाघण गाव बौद्धवाडी ता. लांजा) असे असल्याचे या मुलांनी सांगितले.
वडिलांशी संपर्क – वडिल कोकण रेल्वेत कामाला आहेत असेही या मुलांनी सांगितले.यानंतर दामिनी महिला पोलीसांच्या पथकाने तात्काळ वडिलांशी फोनवर संपर्क करुन बोलावून घेतले. वडील आल्यावर दामिनी पथक या मुलांना वडीलांसह घेऊन पोलीस ठाण्यात आले. राजापूरचे पोलीस निरिक्षक जनार्दन परबकर यांनी मुलांना व वडीलांना समजावून सांगितले व मुलांचे मतपरिवर्तन करुन दोन्हीही मुलांना सुरक्षितरित्या त्यांचे वडील महेंद्र गणपत जाधव व चुलते शिलेंद्र यांच्या ताब्यात देण्यात आले.
पालकांनाही मार्गदर्शन – तसंच,पोलिसांनी मुलांचे योग्यप्रकारे पालनपोषण करुन सांभाळ करण्याबाबत योग्य त्या सूचना पालकांना दिल्या. राजापूर पोलिसांच्या महिला दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे घरातून न सांगता निघालेली मुले पुन्हा घरी सुखरूप परतली आहेत. यामुळे दामिनी पथकाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.