कोकणच्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अनेक सायकलस्वार ग्रुपने अथवा एकट्याने सुद्धा लांब लांबचे पल्ल्ले पार करून निसर्गाचा आस्वाद घेत सफारीसाठी निघतात. आणि काही तर चक्क चालत किंवा धावत कोकणात दाखल होतात.
डोंबिवलीचे सुप्रसिध्द बालरोगतज्ञ डॉ. अजित ओक आणि मुलुंडमध्ये रहाणारे सतीश गुजरन हे राष्ट्रीय धावपटू आहेत. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धांमध्ये त्यांनी अनेकवेळा सहभाग घेतला आहे. याशिवाय पोलीस दल, नौदल यासह विविध कंपन्यांमधील उच्चस्तरीय अधिकारी, उद्योजक यांना धावण्याचे प्रशिक्षणही ते पुरवतात. हे दोन पर्यटक गुहागरपासून चक्क धावत गणपतीपुळ्यापर्यंत पोहोचले आहेत.
गुहागरमध्ये हे दोघे पर्यटनासाठी आले होते. त्यांनी गुहागरमधील पर्यटन व्यावसायिक केदार खरे यांच्याजवळ गुहागर ते गणपतीपुळे धावत जाण्याची कल्पना मांडली. रुट मार्शल म्हणून काम करण्याची तयारी केदार खरे यांनी दाखवली आणि १३ जानेवारीला भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीतून श्री व्याडेश्र्वराचे दर्शन घेवून ओक आणि गुजरन यांनी धावण्यास सुरुवात केली.
या प्रवासात त्यांनी भातगांव राई पुलावर पायांना काही काळ आराम मिळावा म्हणून थांबून थोडा व्यायाम केला आणि पुन्हा धावण्यास सुरुवात केली. गणपतीपुळेला पोहोचण्यासाठी त्यांना तब्बल ११ तास १२ मिनिटे आणि ५८ सेकंद इतका वेळ लागला असून, या वेळात त्यांनी ८०.८० कि.मी.चे अंतर पार करुन गणपतीपुळे गाठले.
या उपक्रमाविषयी बोलताना डॉ. अजित ओक म्हणाले की, माझे मुळ गांव गुहागरमधील वेळंब हे आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य न्याहाळत पर्यटन करायचे असेल तर चालत, धावत किंवा सायकलने करावे. अशा प्रवासात आपल्याला अनेक पक्षी भेटतात. निसर्गाची विविध रुपे जवळून अनुभवता येतात. त्यांचा आनंद लुटता येतो.
धावपटू, अन्य ॲथलीट हे देखील कोकणात यावेत यासाठी आम्ही हा उपक्रम केला. यामध्ये आमची व्यवस्था केदार खरे यांनी उत्तम रितीने सांभाळली. असे उपक्रम केल्याने, येथील पर्यटन व्यवसाय अधिक समृध्द होईल.