रत्नागिरी पोलिस गुन्हे आणि गुन्हेगारांबद्दल किती सतर्क राहतात याबाबत आपण अनेकदा वाचले असेल. काही केसेस अशा असतात कि, वाटते कि यामध्ये केस पुढे जायला किती काळ लागेल नी काय ! रत्नागिरीमध्ये सुद्धा दहा वर्षापूर्वी अशीच एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून संशयित आरोपी फरार झाल्याची घटना घडली होती.
आज रत्नागिरीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या संशयिताला १० वर्षानंतर ग्रामीण पोलिसांनी त्याच्या गावात जाऊन घरातून आणून अटक केली आहे. अनुजकुमार स्वामीनाथ चौहान रा. उत्तराप्रदेश असे या संशयित आरोपीचे नाव आहे. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे.
रत्नागिरीमध्ये २०११ सालामध्ये अनुजकुमार याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीवरून अनुजकुमार याच्या विरूध्द भारतीय दंड विधान कलम ३७६, ३४१, ३३७, ३३८ नुसार रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच अनुजकुमार याला पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली होती.
न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर अनुजकुमार हा फरार झाला होता. अनुजकुमारला पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. यानंतर न्यायालयाकडून ३० ऑक्टोबर २०२१ रोजी अजामिनपत्र वॉरट बजावण्यात आले होते. यानंतर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अनुजकुमारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
उत्तरप्रदेश येथील आपल्या गावी अनुजकुमारचा शोध घेण्यात आला. अनुजकुमार हा त्याच्या मुळ गावी राहत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाली व त्याला राहत्या घरातून अटक करण्यात आली. पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदकुमार साळवी व पोलीस नाईक महेंद्र खापरे यांनी ही कामगिरी उत्तमरित्या बजावली.