24.7 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriरत्नागिरी मतदारसंघात २३ हजार बनावट मतदार - बाळ माने

रत्नागिरी मतदारसंघात २३ हजार बनावट मतदार – बाळ माने

राज्यात अनेक मतदारसंघात अशी फुगीर मतदारयादी झाली आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही २३ हजार बनावट मतदारांची नोंदणी झाली आहे. पगारी मतदार तयार करण्याचे हे एक षड्यंत्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी केला. मतदार यादीतील ही बोगस नावे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी रद्द करावीत, अशी मागणी त्यांनी निवडणूक विभाग आणि आयोगाकडे केली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बाळ माने म्हणाले, मतचोरीचा मुद्दा सध्या गाजत असताना रत्नागिरी मतदारसंघातदेखील असा धक्कादायक प्रकार घडला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण बोगस मतदारांची नावे प्रांताधिकाऱ्यांना दिली होती; परंतु त्यानंतर प्रशासनाने त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. देशभर हा विषय चर्चेत असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर प्रकाश टाकला आहे.

राज्यात अनेक मतदारसंघात अशी फुगीर मतदारयादी झाली आहे. रत्नागिरी मतदारसंघातही २३ हजार बनावट मतदारांची नोंद झाली आहे. वर्षभरापूर्वी आपण पुराव्यासह ही यादी सादर केली होती; परंतु ही नावे ना वगळली गेली, ना रद्द करण्यात आली. त्यावेळी उबाठाचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, काही विभागप्रमुख हे बेईमान झाले. पक्षात असलेल्या घरभेदींमुळे फार लक्ष ठेवता आले नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत या बनावट मतदारांचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो. यामुळे इच्छुक असणाऱ्या सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व संभाव्य उमेदवारांनीही आपल्या भागातील मतदारयादी पाहून त्याबाबत तक्रार करावी. प्रशासनानेही बनावट नावे वगळून मतदारांची कायदेशीर नावे ठेवावीत, अशी मागणीही त्यांनी केली. नवीन यादी अद्ययावत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणीही बाळ माने यांनी केली आहे.

उमेदवारी निवड अनोख्या पद्धतीने – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार ठरवण्याची अनोखी पद्धत आम्ही अवलंबणार आहोत. यावेळी त्या त्या गट-गण, प्रभागांमध्ये जनतेला कोणता उमेदवार हवा, याची चाचपणी केली जाईल. ज्याला जास्त पसंती असेल त्याला उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणुकीतील पैशांचा खेळ कमी होईल. जनताच आपला उमेदवार ठरवेल, असे बाळ माने यांनी सांगितले.

कोकणातही शेतीचे मोठे नुकसान – मराठवाड्याप्रमाणेच कोकणातही जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भात, नाचणी आदी पिकांना याचा फटका बसला आहे. या पिकांचेही पंचनामे करावेत व लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही माने यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular