जिल्हा ग्रामीण व शहरी भाग मिळून एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ अखेर २ लाख ३४ हजार ८१५ संशयित रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी वर्षभरात ७ रुग्ण मलेरिया झालेले आढळले. हिवताप रुग्णांचा दर कमी झाला असून डेंगीसारख्या आजाराने डोके वर काढले आहे. वर्षभरात ४७५ रक्तजल नमुन्यांच्या तपासणीत २३६ जणांना डेंगी झाला होता. हिवताप, डेंगीसारख्या कीटकजन्य आजाराबद्दल जनतेमध्ये जनजागृती निर्माण करून त्याबद्दल प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून जागतिक हिवताप दिन साजरा केला जातो.
रत्नागिरीतील जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. एप्रिल, मेमध्ये पाण्याची टंचाई बघता नागरिक पाणी वापण्यासाठी ड्रम आणि भांडी यामध्ये पाणी साठवून ठेवतात. जर योग्य काळजी नाही घेतली तर डास उत्पत्ती होऊन डेंगी रुग्णांची संख्या आणखीनच वाढून डेंगीचा उद्रेक होऊ शकतो. जागतिक हिवताप दिनाचे या वर्षाचे घोषवाक्य थंडी वाजून ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, घाम येणे, अंगदुखी ही हिवतापाची लक्षणे आहेत.
सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संशयित तापरुग्णांचे हिवताप निदान रक्तनमुन्यांची तपासणी करून केली जाते. तापाची लक्षणे जाणवायला ” लागल्यानंतर जवळच्या सरकारी दवाखान्यात हिवतापाची चाचणी करून घेतली पाहिजे. या वेळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा, विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे तसेच हिवताप कार्यालयातील आरोग्य पर्यवेक्षक एल. जी. पुजारी, कांबळे, चौगुले, आरोग्य सहाय्यक कुवळेकर, कोळेकर उपस्थित होते.
नियंत्रणात्मक उपाययोजना – हिवताप व डेंगी नियंत्रणासाठी गावाच्या किंवा घराच्या सभोवताली असणारी डबकी, खड्डे बुजवावीत, गटारे वाहती करावीत, इमारतीच्या टाक्या, हौद यांना घट्ट झाकणे बसवावे अथवा घट्ट कापड बांधावे, पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून घासूनपुसून कोरडी करावीत. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. फ्रिज, कूलर, फ्लॉवरपॉट्स, कुंड्या, डबे व अन्य वस्तूंमध्ये जास्त काळ पाणी साठू देऊ नये. तिथे डासांची पैदास होते. रात्री झोपताना कीटकनाशकभारीत मच्छरदाणीचा वापर करावा व शक्यतो पूर्ण अंग झाकले जाईल, असे कपडे घालावेत. गावाभोवतालच्या मोठ्या पाण्याच्या साठ्यांमध्ये डास अळीभक्षक गप्पी मासे सोडावेत. हिवतापाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नियंत्रणात्मक उपाययोजनांबाबत जनतेत जागृती निर्माण करणे.