कोकण रेल्वेमार्गावरून नियमित धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसह मध्य, कोकण व पश्चिम रेल्वेने तीन टप्प्यांत जाहीर केलेल्या २४२ गणपती स्पेशलच्या फेऱ्यांचेही आरक्षण फुल्ल झाल्यामुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांना गाव गाठण्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या नजरा जादा गणपती स्पेशल गाड्यांवर आहेत तसेच उत्तर व दक्षिण रेल्वेमार्गावर लोहमार्ग देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी १७ सप्टेंबरपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे ऐन गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मध्य रेल्वेने पहिल्या टप्प्यात – गणेशोत्सवासाठी २०२ गणपती जादा फेऱ्या जाहीर केल्या. त्यामध्ये दिवा चिपळूण मेमू स्पेशलच्या ३६ फेऱ्यांचाही समावेश आहे. १६६ गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण खुले होताच अवघ्या ८ मिनिटांतच सर्वच फेऱ्या हाऊसफुल्ल होऊन चाकरमान्यांच्या हाती प्रतीक्षायादीवरील तिकिटे पडली होती. आरक्षित तिकिटांवर दलालांनीच डल्ला मारल्याचा आरोपही करण्यात आला; मात्र रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या सहाही गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल झाले. त्यामुळे पुन्हा चाकरमान्यांचा हिरमोड झाला. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या २०० फेऱ्यांचे आरक्षणही फुल झाल्याने पदरी निराशाच पडली. तिन्ही टप्प्यांत चाकरमान्यांच्या पदरात प्रतीक्षायादीवरील तिकिटे पडल्याने गावी जाण्याच्या नियोजनावर पुरते पाणी फेरले गेले. याचा गणेशोत्सवात चाकरमान्यांना मोठा फटका बसणार आहे. प्रतीक्षायादीवरील तिकिटावरून प्रवास केल्यास दंडात्मक कारवाईसह कोणत्याही स्थानकात प्रवाशांना उतरवण्याची कारवाई केली जाणार आहे. यामुळे चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. यामुळे वेटिंगचे तिकिट काढूनही आरक्षण डब्यातून प्रवास क्रता येणार नसल्यामुळे चाकरमान्यांना गाव गाठताना त्रास सहन करावा लागणार आहे.
मंदगती असतानाही ‘अतिजलद’ भार ! – प्रवाशांचा रेल्वेप्रवास वेगाने व्हावा यासाठी भारतीय रेल्वेवरून अतिजलद (सुपरफास्ट) रेल्वेगाड्या धावतात. त्यासाठी तिकीट दरात ‘अतिजलद अधिभार’ आकारला जातो. कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रकामुळे सुमारे ३२ अतिजलद रेल्वेगाड्यांचा वेग मंदावला आहे. तरीही या रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांकडून ‘अतिजलद’ रेल्वेगाडीच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क घेतले जाते. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले आहे. या काळात रेल्वेगाड्यांचा वेग कमी केला जातो; परंतु रेल्वे प्रशासनाकडून अतिजलद गाडीच्या निकषांत कोणताही बदल किंवा शिथिलता आणली जात नाही, याकडे कोकण रेल्वे समितीने लक्ष वेधले आहे.
देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक – गाडी मिळवण्यासाठी धडपड सुरू असतानाच उत्तर व दक्षिण रेल्वेमार्गावर लोहमार्ग देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी २० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत ब्लॉक घेण्यात येत आहे. चंदीगड-मडगाव एक्स्प्रेस रद्द केली असून, चंदीगड-कोचुवेल्ली एक्स्प्रेस अन्य मार्गे वळविण्यात येणार आहे. चंदीगड मडगाव एक्स्प्रेस ७, ९, १४, १६ सप्टेंबरला तर मडगाव-चंदीगड एक्स्प्रेस १०, ११, १७, १८ सप्टेंबरला रद्द केली आहे. चंदीगड-कोचुवेली एक्स्प्रेस ६, ११, १३ सप्टेंबरला आदर्शनगर, दिल्ली कांट, रेवारी, म थुरामार्गे वळविण्यात आली आहे. कोचुवेल्ली- चंदीगड एक्स्प्रेस ७, ९, १४ सप्टेंबरला याच मार्गाने धावेल. कोचुवेल्ली-अमृतसर व अमृतसर-कोचुवेल्ली एक्स्प्रेस, एर्नाकुलम- निजामुद्दीन, निजामुद्दीन एर्नाकुलम एक्स्प्रेसही याच मार्गाने धावणार आहेत. १६ सप्टेंबरला मडगाववरून सुटणारी राजधानी एक्स्प्रेस ४.४० मिनिटे उशिराने दुपारी सुटेल. १० सप्टेंबरची एर्नाकुलम – निजामुद्दीन एक्स्प्रेस उत्तर, मध्य रेल्वेच्या विभागात अर्धा तास थांबविली जाणार आहे. यांचा चाकरमान्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.