शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शहर परिसरात नुकतेच सर्वेक्षण केले. यामध्ये शहरात २७५ मोकाट गुरे असल्याचे निष्पन्न झाले. गायी, बैल, वासरे आदींचा यामध्ये समावेश आहे. मोकाट गुरांचा उपद्रव थांबावा यासाठी पालिकेकडून आश्वासक हालचाल व्हावी, अशी मागणी या संस्थेने केली आहे. सोमेश्वर शांतीपीठ संस्था रत्नागिरीचे कार्यकर्ते राजेश आयरे यांच्या पुढाकाराने शहरात मोकाट असलेल्या गोवंशाचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. सर्वाधिक जनावरे राजिवडा, जुवे, कर्ला, आंबेशेत परिसरात रस्त्यावर भटकताना आढळली.
यात सुमारे ३९ जनावरे होती. त्या खालोखाल जे. के. फाईल्स, एमआयडीसी परिसरात ३८ गुरे दिसली. टीआरपी, कुवारबाव रेल्वेस्टेशन परिसरात ३६ जनावरे आढळून आली. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा, मिऱ्या, किल्ला परिसरात २१ जनावरे मोकाट फिरताना आढळली. लक्ष्मीचौक, झाडगाव, परटवणे भागात फिरणाऱ्या जनावरांची संख्या ३४ भरली. घुडेवठार, चवंडेवठार, मांडवी भागात २६ गायी, बैल, वासरे दिसली. बसस्टॅण्ड, माळनाका, शिवाजीनगर भागात ३३ जनावरे आढळली.
भाट्ये परिसरात १९ तर नाचणे परिसरात २७ जनावरे मालकाविना मोकाट फिरत असल्याचे निदर्शनास आले. एकूण २७५ जनावरे सर्वेक्षणात आढळली. कदाचित याहून अधिक जनावरेदेखील असू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. भटक्या जनावरांना निवारा मिळावा यासाठी उत्सुक आहेत. रत्नागिरी पालिकेने त्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी मागणी या संस्थेने केली आहे.
कारवाई थांबल्याने वाढला उपद्रव – पालिकेकडून कारवाई थांबल्यापासून शहरात मोकाट गुरांचा उपद्रव वाढतच चालला आहे. रस्त्यात मधोमध ही गुरे कळपाने बसतात, रस्त्यात उभी असतात, यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. अचानक ती समोर येत असल्याने अपघातही होत आहेत. त्यामुळे पालिकेने मोकाट गुरांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचाराची गरज आहे.