रत्नागिरी (कोकण) आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटातील प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. कारण या घाटातील डोंगरातून साडेतीन किलोमीटरचा बोगदा काढण्यास मंजुरी मिळाली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणं आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास अत्यंत सुरक्षित आणि जलद होणार आहे. यासाठी सध्या एका खासगी एजन्सीकडून या प्रकल्पाचे सर्वे क्षण सुरु करण्यात आले आहे. एकीकडे, कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण युद्धपातळीवर सुरु असतानाच, आंबा घाटाच्या सुधारणा आणि रुंदीकरणाच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.
हा घाट हा साधारण ७ किलोमीटर लांबीचा आहे. पावसाळ्यात अनेक वेळा दरड कोसळण्याचे प्रकारही या घाटात घडतात. या पार्श्वभूमीवर, घाटातील धोकादायक भाग कायमस्वरुपी वगळण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. सर्वेक्षणानंतर बोगद्याची लांबी, रुंदी आणि तांत्रिकदृष्ट्या आराखडा तयार करण्यात येईल. या आराखड्यानंतर अंदाजपत्रक तयार करून त्याला मंजुरी मिळाल्यावर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. त्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरु होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पर्यावरणाचा समतोल राखून घाटातील वन्य प्राणी, राष्ट्रीय उद्यान आणि जंगल परिसराचा विचार करून हा प्रकल्प अहवाल येणार निश्चित करण्यात येणार असून त्यानुसारच याला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे.