सावित्री नदी व अरबी समुद्राचे संगमावर बाणकोट, बांगमाडला, वेळास या तीन गावांच्या हद्दीत समुद्रात तीन किलोमीटरहून अधिक लांबीचा सँडबार तयार झाल्याने गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ जलमार्गास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील वाल्मीकीनगर, बाणकोट, वेसवी, शिपोळे या गावातील मासेमारी व जलवाहूतक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पर्यायाने येथील मच्छीमार व्यावसायिक अडचणीत आहेत. मुख्य व्यवसाय मासेमारी असल्याने या व्यवसायात निर्माण झालेल्या नैसर्गिक अडचणींमुळे उद्विग्न झालेले येथील मच्छीमार बांधव अन्य व्यवसायाच्या शोधात आहेत. सरकार दरबारी अनेक वेळा खेटा घालून सुद्धा त्यांच्या समस्येचे निवारण करण्यास शासन अपयशी ठरले आहे.
खाडी मुखाशी निर्माण झालेला सँडबार अथवा वाळू पट्टा काढून समुद्रात जाण्यास मार्ग मोकळा करावा, अशी या मासेमारी व्यावसायिकांची कित्येक वर्षांची मागणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे व संबंधित विभागांकडे धूळ खात पडली आहे. या सँडबारमुळे खाडीतून समुद्रात होणाऱ्या जलवाहतुकीत अडथळा निर्माण होतो. विशेषतः ओहोटीच्यावेळी ही वाहतूक अतिशय खडतर होते. अनेकवेळा बोटी वाळूत रुततात. बाणकोट खाडी व अरबी समुद्राच्या या भागातून सर्व प्रकारच्या नौकानयन अडचणीत आलेल्या असताना दुसरीकडे सावित्री नदीच्या बँकवॉटरमध्येही मासे येण्याचे प्रमाण संपुष्टात आल्याने लहान व मोठे मच्छीमार अडचणीत सापडले आहेत.
बहुतांश वेळी या भागात कोळंबी वगळता अन्य सर्व प्रकारचे मासे मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुक्यातील वाल्मीकीनगर या गावात मच्छीमार बांधव असून नव्वद टक्के असलेल्या या ग्रामस्थांचे उदरनिर्वाहाचे साधन मच्छीमार आहे. नैसर्गिक संकट व मासळीच्या अभावामुळे समुद्रात सत्तर ते ऐंशी किलोमीटर जाऊन त्यांना मच्छीमारी करावी लागते. वाळुच्या टापुमुळे समुद्रात जाताना व परत येताना जिवावरचे संकटास सामोरे जाऊनच पुढचा प्रवास करावा लागतो. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन खाडी व समुद्राचा मुखाशी तयार झालेला गाळ तातडीने काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.