यंदाच्या पावसाळी हंगामातील मासेम ारी बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३ नौकांवर मत्स्य विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ३७ हजाराची मासळी जप्त करण्यात आली. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांपुढे याची सुनावणी होऊन असून संबंधित नौका मालकांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १ जूनपासून मासेमारी बंदी लागू झाली आहे; परंतु काही मच्छीमार बंदी आदेश धाब्यावर बसवून मासेमारी करतात. अशा नौकांवर मत्स्य विभागाकडून कारवाई केली आहे. रत्नागिरी समुद्रात मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर साहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी केलेल्या कारवाईची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाने पत्रकारांना दिली.
त्यानुसार मजीद भाटकर आणि मुकद्दर बोरकर यांच्या मालकीच्या या नौका आहेत तसेच जयगड येथील समुद्रात मासेमारी करणाऱ्या लिना बिर्जे यांच्या नौकेवर परवाना अधिकारी स्मितल कांबळे यांनी कारवाई केली आहे. मासेमारी बंदी १ जून ते ३१ जुलैपर्यंत असते. या कालावधीत मसेिमारीसाठी गेलेल्या ३ नौका पकडून आतापर्यंत कारवाई केली आहे. या तिन्ही नौकांसंदर्भात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. त्यानंतर या नवीन मत्स्यधोरणानुसार संबंधित नौकामालकांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.