रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा उपद्रव लवकरच कमी होणार आहे. शहरात रस्ता असो, चौक असो, दुकानांपुढील रिकामी जागा असो सर्वत्र मोकाट गुरांचा मुक्त संचार सुरू आहे; परंतु यावर प्रसारमाध्यम आणि राजकीय पक्षांनी आवाज उठवल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. पालिकेने दोन दिवसांमध्ये एकूण ४२ मोकाट गुरांना पकडून चंपक मैदान येथील निवाराशेडमध्ये ठेवले आहे. त्यामुळे शहरातील मोकाट गुरांची संख्या थोडी कमी झाली आहे. रत्नागिरी शहर स्मार्ट सिटीच्यादृष्टीने विकसित होत आहे. अनेक नवीन प्रकल्प आणि थिम राबवल्या जात आहेत. चौक सुशोभित करण्यात आले आहेत, विद्रुपीकरण करणारे बॅनर, होर्डिंग हटवण्यात आले आहेत, शिवसृष्टी, तुळशी वृंदावन, विठ्ठलाची उंच मूर्ती, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, रस्त्यांचे काँक्रिटीकरण असे अनेक उपक्रम राबवल्यामुळे पर्यटक वाढत आहेत; परंतु त्याला गालबोट लागते ते मोकाट गुरांमुळे.
शहरात कुठे गेला तरी मोकाट गुरे दिसतात. कळपाने फिरणारी ही गुरे चौकात रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसतात. अचानक रस्त्यात आडवी येतात. किती हॉर्न दिले, हाकलले तरी हालत नाहीत यामुळे होणारी वाहतूककोंडी अशा अनेक प्रश्नांना वाहनधारकांना आणि नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पालिकेवर धडक मारून या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले. एक कोटी खर्च करून निवाराशेड बांधली असून, ती ओस पडली आहे आणि गुरे शहरात मोकाट फिरत आहेत. मग कशाला ही शेड बांधली? दोन दिवसांत मोकाट गुरे निवाराशेडमध्ये नेली नाहीत, तर पालिकेत आणून बांधू, असा इशारा शिवेसनेने दिला होता.
मोहीम सुरूच राहणार – मोकाट गुरांना पकडण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. एकूण ४२ गुरे पकडली आहेत. यामध्ये १५ वासरू, २४ गाय, ३ बैलांचा समावेश आहे. यापुढे ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.