26.9 C
Ratnagiri
Wednesday, October 30, 2024
HomeRatnagiriआरजू'चा फडा याची टोपी त्याला… रत्नागिरीकरांना ५ कोटींचा चुना

आरजू’चा फडा याची टोपी त्याला… रत्नागिरीकरांना ५ कोटींचा चुना

गुंतवणूकदारांनी तब्बल ५ कोटी ३९ लाख ५७ हजार ४५५ रुपयांची गुंतवणूक केली आहे.

गुंतवणुकीच्या नावाखाली एकाकडून रक्कम घ्यायची आणि दुसऱ्याला परतावा द्यायचा, अर्थात याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला, असा प्रकार आरजू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. कंपनीत १४० कर्मचारी वाऱ्यावर आहेत. त्यापैकी पोलिसांनी ३० कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले आहेत. आतापर्यंत ४७५ गुंतवणूकदारांचे जबाब घेतले असून ५ कोटी ३९ लाख ५७ हजार गुंतवल्याचे तपासात पुढे आली आहे. या प्रकरणातील संशयित प्रसाद शशिकांत फडके (रा. गावखडी, ता. रत्नागिरी), संजय गोविंद केळकर यांना पोलिसांनी अटक केली होती.

त्यांची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे, मात्र संजय विश्वनाथ सावंत आणि अनि ऊर्फ अमर महादेव जाधव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) सापडलेले नाहीत. ही घटना २०२१ ते २३ मे २०२४ या कालावधीत घडली होती. घरगुती छोट्या उद्योगांच्या नावाखाली रत्नागिरीकरांना ५ कोटींचा चूना कंपनीने लावला आहे.रत्नागिरी एमआयडीसीमध्ये आरजू टेकसोल कंपनी स्थापन करून कच्चा माल देतो, पक्का माल तयार करून द्या, अशी जाहिरात करत या कंपनीने असंख्य लोकांची फसवणूक केली. कंपनीने गुंतवणूक गोळा करायला सुरुवात केली. त्यावर परतावा देण्याचे आश्वासन दिले.

परताव्याच्या आमिषाला अनेकजण बळी पडले. आतापर्यंत पोलिसांनी ४७५ गुंतवणूकदारांचे जबाब घेतले आहेत. या गुंतवणूकदारांनी तब्बल ५ कोटी ३९ लाख ५७ हजार ४५५ रुपयांची गुंतवणूक केली आहे. अजूनही काही गुंतवणूकदार आहेत, ते पुढे आलेले नाहीत. आरजू टेक्सोलने आपला विस्तार सिंधुदुर्ग, सांगली आणि दिल्लीपर्यंत वाढवला होता. कंपनीत तब्बल १४० कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले होते. त्यापैकी ३० कर्मचाऱ्यांचा पोलिसांनी जबाब घेतला आहे. पुढील काही दिवसांत अन्य काही कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला जाणार आहे. शेवटचे काही महिने कर्मचाऱ्यांचा पगार न दिल्याची माहिती पुढे येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular