चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी वादळी पाऊस पडला. या पावसात अनेक घरांवर झाडे व त्यांच्या फांद्या कोसळल्या. तर अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे व कौले उडाली. अवकाळी पावसामुळे ३० लाख ६२ हजार, ९७० रूपयाचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाच्या पंचनाम्याच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. वादळामुळे काही ठिकाणी विद्युत वाहिन्यां व पोलवर झाडांच्या फांद्या कोसळून नुकसान झाले आहे. आंबा, फणसाचे मोठे नुकसान झाले. मार्कंडी येथे बी अॅड सी कॉलनीत विजेच्या खांबावर झाड कोसळून दोन खांब वाकल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता.
तालुक्यातील रामपूर, ‘कोळकेवाडी, कामथे, खेर्डी आणि पोफळ येथील ५५ घरांचे अंशतः नुकसान होऊन १७ लाख ९९ हजार ४७० रुपयाचे नुकसान झाले. ६ गोठ्यांचे अंशतः १ लाख १९ हजार ५० रुपये नुकसान झाले. तर एका गोठ्याचे पूर्णतः नुकसान होऊन चार गुरे दगावली त्यात २ म्हशीं, १ जर्सी गाय, वासराचा समावेश होता. त्यांचे ५ लाख १० हजाराचे नुकसान झाले. ६ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होऊन ६ लाख ३४ हजार ४५० रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हवेत काही काळ गारवा पसरला होता. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता.