कोकणात पावसाळ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर घाटपरिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होते आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. हे घाट संरक्षित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुणे एक्स्प्रेस हायवेच्या धर्तीवर संरक्षक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५० कोटी मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परशुराम, कशेडी, वरंध आणि कारूळ या घाटातील धोकादायक ठिकाणांवर सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. याला राष्ट्रीय महामार्ग विभागाये अधिकारी पंकज गोसावी यांनी दुजोरा दिला.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक छोटे-मोठे घाट आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या दरडी कोसळण्याचे घडत आहेत. यंदाही घाटात सुरवातीलाच घाटात प्रकार परशुराम भुस्खलन झाल्यामुळे वाहतूक खंडित झाली होती तर कारूळ घाटात दरड कोसळली. कशेडी घाटात भविष्यात दगड- माती येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या घाट परिसराम कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी उत्तराखंड येथील टिहेरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने कोकणातील घाटांची पाहणी करून दरडी कोसळू नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर अहवाल तयार केला आहे.
त्यानुसार तत्काळ उपाययोजनाही केल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून ५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पुणे एक्स्प्रेस हायवेवर अनेक ठिकाणी डोंगरातून माती घरंगळत येऊ नये यासाठी वायरनेट, शॉर्टक्रिक करणे (मशिनद्वारे सिमेंटचा थर घाटाच्या बाजूने मारणे) विशिष्ट पद्धतीने गवताची लागवड करणे, रॉक बोल्टिंग करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हे संरक्षक उपाय परशुराम, कशेडी, कारूळ आणि वरंधा घाटात करण्यात येणार आहेत. ही कामे पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जाणार असून, सध्या निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.