28.4 C
Ratnagiri
Friday, October 25, 2024
HomeRatnagiriडेंगीच्या अळीने रत्नागिरी जिल्ह्यातील ७२ घरे दूषित

डेंगीच्या अळीने रत्नागिरी जिल्ह्यातील ७२ घरे दूषित

डेंगी आणि तापसरीच्या रुग्णांची संख्या सर्वांत जास्त आहे.

जिल्ह्यात डेंगीचा विळखा वाढतच चालला आहे. जिल्हा हिवताप विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये एकूण ७२ घरे दूषित आढळून आली आहेत तर २०३ दूषित भांडी मिळाली. त्यामुळे एकूण ६६१ घरांमध्ये डास निर्मूलनासाठी फवारणी करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे पावणेदोनशे डेंगीचे रुग्ण सापडल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली; मात्र खासगी रुग्णालयाची यामध्ये नोंद नसल्याने डेंगीच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यात तापसरीची साथ असल्याने जिल्हा रुग्णालय देखील रुग्णांनी फुल्ल झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तेवढ्या गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

पावसादरम्यान उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा सतर्क पाहिजे; परंतु ती तेवढी सतर्क दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. रत्नागिरी तालुक्यात डेंगी आणि तापसरीच्या रुग्णांची संख्या सर्वांत जास्त आहे. साथ येऊ नये यासाठी यंत्रणा न करता साथ आल्यानंतर ती आटोक्यात येण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. ते प्रयत्न देखील तेवढे ठोस नसून थातुरमाथूर सुरू आहे. डास निर्मूलनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी फवारणीवर जोर दिला पाहिजे. त्यासाठी लागणारी औषधे उपलब्ध असली तरी तेवढ्या पारदर्शकतेने फवारणी होत नाही.

त्यामुळे डासांचे निर्मूलन न होता अधिक उत्पत्ती झाल्यामुळेच डेंगीची साथ पसरल्याचे स्पष्ट होत आहे. तापसरीचे २८५ रुग्णांची तपासणी करून त्यांचे रक्तनमुने घेतले. एकूण डासअळीसाठी १ हजार १९२ घरे तपासली. त्यापैकी ७२ घरे दूषित सापडली. त्यामध्ये डेंगीच्या डासाच्या अळ्या सापडल्या तसेच ४ हजार २९३ भांड्यांची तपासणी केली. त्यापैकी २०३ भांडी दूषित आढळली. १०८ भांडी रिकामी केली, तर चार ठिकाणी गप्पी मासे सोडले आणि एकूण ६६१ घरांमध्ये फवारणी केली.

रुग्णालयातील खाटा अपुऱ्या – शासकीय रुग्णालयामध्ये जरी पावणेदोनशे डेंगीचे रुग्ण असले तरी खासगी रुग्णालयातील आकडेवारी नसल्याने ही संख्या मोठी आहे. तापसरीचे रुग्णदेखील मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील खाटा आता कमी पडू लागल्या आहेत. साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular